सौराष्ट्रमध्ये कोरोनाचा प्रकोप शिगेला पोहोचलेला आहे. भगवान श्रीकृष्णाची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवभूमी द्वारकेतही कोरोनामुळे एका कुटुंबानं आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय. द्वारकेतल्या एका कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे कोरोनाने निधन झालं, त्यानंतर संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली.
द्वारका येथील रहिवासी जयेश भाई जैन नाश्त्याचे दुकान चालवत होते. गुरुवारी रात्री कोरोनाच्या विळख्यात सापडल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. जेव्हा निधनाची बातमी समोर आली, तेव्हा संपूर्ण कुटुंबात भीतीचं वातावरण निर्माण झाले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी जयेश भाईचा अंत्यसंस्कार करून त्यांची पत्नी साधना बेन आणि दोन मुले कमलेश आणि दुर्गेश जैन यांनीही आत्महत्या केली. या तिघांनीही विष प्राशन करून स्वत: ची जीवनयात्रा संपवल्याचं सांगण्यात येत आहे.
दूध टाकणारी व्यक्ती जेव्हा घरी आली, तेव्हा ही घटनाही उघडकीस आली. दूधवाल्याला घराचा दरवाजा उघडलेला आढळला. कुटुंबातील तिन्ही सदस्यांचे मृतदेह जमिनीवर पडले होते. त्यानंतर लगेच ही माहिती पोलिसांना देण्यात आली आणि या प्रकरणाचा तपास सुरू झाला. त्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले. तसेच सामूहिक आत्महत्येचा गुन्हा दाखल केलाय. देवभूमी द्वारका येथील या घटनेने सर्वांनाचा धक्का बसलाय.
कोरोना काळात जेव्हा परिस्थिती आधीच बिघडलेली असताना या घटनेनं सर्वांना हादरवून टाकलंय. संपूर्ण भागात शांतता पसरली असून, भीतीचे वातावरण आहे. जयेश भाई जैन यांचे संपूर्ण कुटुंबही खूप घाबरले असल्याचे सांगण्यात आलेय. जयेश भाई यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तेव्हापासून संपूर्ण कुटुंब काळजीत पडले होते. जयेश भाई जैन यांच्या निधनांचं दुःख कुटुंबाला सहन न झाल्यानं त्यांनी सामूहिक आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचं सांगितलं जात आहे.
गुजरातच्या कोरोना प्रकोपाबद्दल बोलायचे झाल्यास हे राज्य कोविडचे हॉटस्पॉट बनलेय. सातत्याने कोरोनाची रुग्ण वाढत असून, मृत्यूही मोठ्या प्रमाणात होत आहेत. आता मृतदेह जाळण्यासाठी स्मशानभूमी लहान पडत असल्याचं चित्र निर्माण झालंय. दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या परिस्थितीत द्वारकेतल्या बातमीनं अनेकांचा धाबे दणाणलेत. कोरोना आजारानं कमी तर भीतीनंच लोकांचा जीव जात असल्याची आता चर्चा सुरू झालीय.