उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी,
दोन दहशतवाद्यांना अटक
लखनऊमध्ये आज दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कारवाई करत अल कायदा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केल्यावर व मोठ्या प्रमाणावर स्फोटकं हस्तगत करण्यात आल्यानंतर आता उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम उत्तरपदेश व्यतिरिक्त हरदोई, सीतापूर, बाराबंकी, उन्नाव आणि रायबरेली या जिल्ह्यांसह लखनऊ आयुक्तालयाच्या हद्दीत दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेवरून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. अटक करण्यात आलेले अल कायदाचे दहशतवादी उत्तर प्रदेशमधील लखनऊसह काही जिल्ह्यांमध्ये बॉम्ब स्फोट घडवण्याच्या तयारीत होते.
तालिबानने अफगाणिस्तानच्या ८५ टक्के
भूभागावर कब्जा मिळवल्याचा दावा
अफगाणिस्तानात तालिबानने डोकं वर काढलं असून, वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानच्या ८५ टक्के भूभागावर कब्जा मिळवल्याचा दावा तालिबान या दहशतवादी संघटनेकडून करण्यात आला. या दाव्यानंतर अफगाणिस्तानातील परिस्थिती पुन्हा बिघडण्याची चिन्हं दिसत आहे. अफगाणिस्तानातील कंदहारमध्ये असलेला भारतीय दूतावास बंद करण्यात आल्याचं वृत्त होतं.
केंद्राच्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रात गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नाही : शरद पवार
केंद्राच्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रात गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट सांगितलं आहे. “सहकार कायदे बनवण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या विधानसभेने कायदे केले आहेत. विधानसभेने केलेल्या कायद्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही. केंद्र सरकार महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीवर गंडांतर आणेल या बातम्यांना फारसा अर्थ नाही,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे. सहकार हा विषय घटनेनुसार राज्य सरकारचा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
उत्तर प्रदेशात करोनाच्या कप्पा
विषाणूचे दोन रुग्ण सापडले
उत्तर प्रदेशात करोनाच्या कप्पा विषाणूचे दोन रुग्ण सापडले असून त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजने १०९ नमुन्यांचे जनुकीय सर्वेक्षण केले होते. डेल्टा प्लस विषाणूचा प्रकार १०७ नमुन्यांमध्ये दिसून आला होता
दहशतवादी संघटनांसाठी काम,
जम्मू-काश्मीरचे ११ कर्मचारी बडतर्फ
दहशतवादी संघटनांसाठी काम करीत असल्याचा आरोप करून जम्मू-काश्मीर प्रशासनाने ११ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले असून त्यामध्ये हिजबूल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीन याच्या दोन मुलांचा त्याचप्रमाणे पोलीस खात्यातील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, असे शनिवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धा विम्बल्डन स्पर्धेत
रविवारी नवीन इतिहास लिहिला जाणार
जगातील सर्वात जुनी टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धा विम्बल्डन येथे आज रविवारी नवीन इतिहास लिहिला जाणार आहे. क्रोएशियाची ४३ वर्षीय मारिया सिसक नोव्हाक जोकोव्हिच आणि माटिओ बेरेट्टिनी यांच्यातील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहणार आहे. १८७७ पासून विम्बल्डनच्या १४४ वर्षांच्या इतिहासात पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात एखादी महिला पंच म्हणून कामगिरी करणार आहे.
बेल्जिअममध्ये महिलेला एकाच वेळी
करोनाच्या दोन वेगळ्या विषाणूंची लागण
बेल्जिअममध्ये ९० वर्षीय महिलेला एकाच वेळी करोनाच्या दोन वेगळ्या विषाणूंची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या या महिलेला करोनाच्या अल्फा आणि बेटा या दोन्ही विषाणूंची लागण झाली होती. ही दुर्मिळ घटना असून कमी लेखली जाऊ शकते असंही संशोधकांनी यावेळी सांगितलं आहे.
एकनाथ खडसे यांच्यावरील कारवाई
चुकीच्या पद्धतीने : राज ठाकरे
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर सध्या सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) कारवाई केली जात असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी एकनाथ खडसेंना टोला लगावताना यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याचं म्हटलं आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून यावेळी त्यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अद्याप राजकारणात येण्याचा
विचार नाही़ : उज्ज्वल निकम
एकनाथ शिंदे भेटीनंतर राजकीय वर्तुळात शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरु असताना उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली असून मी अद्याप राजकारणात येण्याचा विचार केलेला नाही़ असं म्हटलं आहे. “एकनाथ शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा झाली असून त्याचा तपशील सांगता येणार नाही. मी शरद पवार यांचा प्रस्तावही नाकारला होता. खासदार संजय राऊत आणि माझी भेट ही केवळ सदिच्छा भेट होती. माझे सर्वच पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध असल्याने ते घरी येत असतात,” असंही त्यांनी सांगितलं आहे.
निर्बंध पूर्णतः काढून दिलासा द्यावा
किंवा कडक लॉकडाऊन करावा : राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील करोना परिस्थितीबद्दल भाष्य करत असताना सध्या राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांसंदर्भातही भूमिका मांडली. “करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध पूर्णतः काढून जनतेला दिलासा द्यावा किंवा कडक लॉकडाऊन करावा, अशी विनंती मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे,”अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
नाना पटोले सारख्या लहान
माणसावर बोलणार नाही : शरद पवार
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाठीत खंजीर खुपसला जात असल्याचा आरोप केला आहे. नाना पटोले यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं म्हटलं आहे. लोणावळ्यात बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधला होता. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाना पटोलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना टाळलं असून त्यांच्यासारख्या लहान माणसावर बोलणार नाही असं म्हटलं आहे. बारामती येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पंकजा मुंडे दिल्लीत दाखल
समर्थकांची नाराजी मांडणार
प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चांना पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला असला तरी समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली. पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत आपण नाही तर समर्थक नाराज असल्याची भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होणंही योग्य असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान राज्यात समर्थकांचं राजीनामासत्र सुरु असतानाच पंकजा मुंडे दिल्लीत दाखल झाल्या आहेत. यावेळी त्या भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत.
SD social media
9850 60 3590