आज दि.२३ जानेवारीच्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

लोकसभा निवडणूक १६ एप्रिलला होणार? निवडणूक आयोगाच्या पत्राने खळबळ

निवडणूक आयोगाच्या एका पत्राने खळबळ निर्माण झाली आहे. या पत्रात सांगण्यात आलय की १६ एप्रिल, २०२४ या दिवशी देशात लोकसभेच्या निवडणूका घेतल्या जातील. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तारखेबद्दल चर्चांणा उधाण आलं. मात्र, निवडणुक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे. निवडणुक आयोगाच्या तयारीसाठी ही तात्पुरती तारीख देण्यात आली आहे, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

त्याआधी एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सांगण्यात आलय की, निवडणुकीची सुरुवातीची तारीख आणि अंतिम तारीख याचा आराखडा तयार करण्यासाठी १६ एप्रिल २०२४ ही तारीख ठरवण्यात आली आहे.

‘श्रीराम हलवा’ची इंडिया व एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद! ‘जय हनुमान’ कढईत तयार झाला सहा हजार किलोचा महाप्रसाद

अयोध्येतील श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्याचे औचित्य साधून कोराडी येथील श्री जगदंबा संस्‍थानमध्‍ये शेफ विष्‍णू मनोहर यांनी सोमवारी श्रीरामभक्‍तांसाठी सहा हजार क‍िलो ‘श्रीराम हलवा’ तयार करून विश्‍वविक्रम नोंदवला. या उपक्रमाला उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत हलवा तयार करण्यासाठी हातभारही लावला. या महाप्रसादाचा विक्रम इंडिया बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्डमध्‍ये श्री जगदंबा देवस्थानच्‍या नावाने नोंदवला जाणार आहे.सकाळी सातच्‍या सुमारास लाकडाच्‍या धगधगत्‍या ज्‍वाळांवर ठेवलेल्‍या ‘जय हनुमान’ कढईमध्‍ये भाजप प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍या हस्‍ते तूप टाकून या उपक्रमाचा प्रारंभ करण्‍यात आला. देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शिऱ्यामध्ये साखर टाकून भव्‍य अशा सराट्याने कढईतील हलवा हलवत महाप्रसाद तयार करण्‍याच्‍या या प्रक्रियेतील खारीचा वाटा उचलला.

केंद्र सरकारची मोठी घोषणा! बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मिळणार भारतरत्न

केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रपती भवनाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारचे दिवंगत मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न (मरणोत्तर) देण्यात येणार आहे. कर्पूरी ठाकूर हे बिहारचे माजी मुख्यमंत्री होते आणि ते मागासवर्गीयांच्या हिताचे समर्थन करण्यासाठी ओळखले जात होते.

कर्पूरी ठाकूर ‘जननायक’ म्हणून प्रसिद्ध होते. डिसेंबर 1970 ते जून 1971 आणि डिसेंबर 1977 ते एप्रिल 1979 पर्यंत ते बिहारचे मुख्यमंत्री होते. कर्पूरी ठाकूर हे त्यांच्या काळातील बिहारचे मोठे नेते होते.

ऑस्करसाठी मानांकनाची यादी जाहीर! सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये ओपनहायमर अन् बार्बीचा समावेश

ऑस्कर 2024 साठीची नामांकनं जाहीर झाली आहेत. 96 व्या अकादमी पुरस्कारांची अधिकृत घोषणा ट्विटरवर करण्यात आली आहे. जिथे ‘ओपेनहायमर’, ‘बार्बी’, ‘पूअर थिंग्स’, ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’, ‘नेपोलियन’ ते ‘मेस्ट्रो’ यांसारख्या चित्रपटांचा दबदबा पाहायला मिळाला. ऑस्कर नामांकने 23 जानेवारी 2024 रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता जाहीर करण्यात आली आहेत. आम्ही तुम्हाला नामांकनांची संपूर्ण यादी सांगतो. या नावाने पुढे हा पुरस्कार मिळेल.

टेकसिटी बंगळुरूमध्ये पुढील तीन दिवस बत्तीगुल…

टेकसिटी बंगळुरूमध्ये पुढील तीन दिवस दिवसभर बत्तीगुल होणार आहे. BESCOM आणि KPTCL कडून देखभाल आणि इतर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शहरातील विविध भागांमध्ये तीन दिवस वीज कपात केली जाणार आहे. दोन्ही वीज कंपन्यांनी बंगळुरूच्या लोकांना वीज कपातीसाची पूर्वसुचना दिली आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करण्याचे सांगितले आहे.

 राहुलच्या हातातून गेली विकेटकीपिंग

भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी घरच्या मैदानावर टीम इंडियाच्या योजना काय आहेत याबद्दल काही संकेत दिले आहेत. केएल राहुल यष्टिरक्षक म्हणून दिसणार नसल्याचे भारतीय मुख्य प्रशिक्षकाने स्पष्ट केले आहे. यांचा अर्थ केएस भरत आणि ध्रुव जुरेल यांच्यात यष्टीरक्षकाच्या भूमिकेसाठी स्पर्धा होऊ शकते.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सदावर्तेंना हायकोर्टाचा दणका

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर गुणरत्न सदावर्तेंना दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करत सदावर्तेंनी मुंबईत न्यायालयात याचिका दाखल केली होती.याचिकेवर सुनावणीस हायकोर्टातील मुळ खंडपीठाने नकार दिला आहे. मनोज जरांगे यांचा अंतरवाली सराटी ते मुंबई असा पायी मोर्चा सुरु झाला आहे. आज ते पुण्यात आहेत. येत्या २६ जानेवारीला जरांगे मराठा आरक्षणासाठी मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना आव्हान केलं आहे.

पुणे विद्यापीठात जगभरातील वैज्ञानिकांची जमणार मांदियाळी ; ‘बायोलॉजी बियॉन्ड बाऊंडरीज’ परिषदेचे आयोजन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान (बायोटेक्नॉलॉजी) विभागातर्फे २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत ‘बायोलॉजी बियॉन्ड बाऊंडरीज’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्यानिमित्ताने जगभरातील नामांकित वैज्ञानिकांची मांदियाळी विद्यापीठात जमणार आहे.सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सायरस पूनावाला यांच्या हस्ते सोमवारी (ता. २९) सकाळी दहा वाजता या परिषदेचे उद्‌घाटन होणार आहे. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

अयोध्येला जाताय तर थांबा! गर्दीमुळे योगी प्रशासनाचा मोठा निर्णय

अयोध्येतील श्री राम मंदिराचा अभिषेक झाल्यानंतर दर्शनासाठी रामभक्तांची गर्दी झाल्याने सर्व सीमा पुन्हा सील करण्यात आल्या आहेत. अयोध्येकडे कोणत्याही वाहनाला जाऊ दिले जात नाही. बांबूच्या खांबांसह ट्रॉली बॅरिअर्स लावून पोलीस कर्मचाऱ्यांसह निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. सीमा सील केल्यामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.बांबूच्या काठ्यांसह ट्रॉली बॅरिअर्स लावून पोलीस कर्मचाऱ्यांसह निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. सीमा सील केल्यामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. येथून केवळ पासधारक, आपत्कालीन सेवा रुग्णवाहिका, परीक्षार्थी, शेतकऱ्यांना डिझेल, पेट्रोल, दूध, भाजीपाला, गॅस सिलिंडर यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने यांची तपासणी आणि खातरजमा केल्यानंतरच सोडण्यात येत आहेत. 

कुनो नॅशनलकडून पुन्हा आनंदाची बातमी, मादी चित्ता ज्वालाने तीन पिलांना दिला जन्म

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातील चित्त्यांचे कुटुंब आता वाढताना दिसत आहे. आज ज्वाला या चित्ता मादीने तीन पिल्लांना जन्म दिला आहे. काही दिवसांपुर्वी दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्तांच्या मृत्यूमुळे चिंता व्यक्त केली होत होती. 16 जानेवारीला शौर्य नावाच्या चित्त्याचे निधन झाले होते. मात्र, आता ज्वाला या चित्ता मादीने तीन पिलांना जन्म दिला आहे, त्यामुळे आनंदाचं वातावरण पसरलं आहे.

गड्या आपली मुंबईच भारी! सुरतमधील हिरे व्यापारी पुन्हा वळले मुंबईकडे

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 17 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये सुरत डायमंड बोर्सचे (SDB) उद्घाटन करण्यात आले होते. ही जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत आहे. जिथे 4,200 हून अधिक व्यापारी कार्यालये आहेत. आत्तापर्यंत, देशाची आर्थिक राजधानी मुंबई हिरे व्यापाराचे केंद्र मानले जात होते.परंतु SDB उघडल्यानंतर, सुरत देखील दागिने आणि हिरे व्यापाराचे एक मोठे केंद्र म्हणून उदयास येणार असे वाटले होते. मात्र या बोर्ससाठी पुढाकार घेणारे प्रख्यात हिरे व्यापारी वल्लभभाई लखानी हे पुन्हा आपला व्यवसाय मुंबईला हलवणार असल्याचं कळतंय.सुरतमध्ये शिफ्ट झाल्यानंतर किरण जेम्सच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. तसेच उत्पन्नात झालेली घट हे देखील मुख्य कारण आहे.

प्रजासत्ताक दिनाला शिवरायांच्या राज्यकारभारावर आधारित चित्ररथ, यवतमाळच्या पाटणबोरीत साकारली शिल्पकृती

प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या कर्तव्यपथावर यंदा ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ पाहायला मिळणार आहे. शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हा चित्ररथ राहणार आहे. महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील पाटणबोरी (ता. पांढरकवडा) येथील तरुणांनी केवळ दहा दिवसांमध्ये या चित्ररथातील शिल्प पाटणबोरी या गावात साकारले.या चित्ररथाची पहिली झलक आज मंगळवारी कर्तव्यपथावरील (दिल्ली) तालमीमध्ये अवघ्या देशाला पाहायला मिळाली. चित्ररथ साकारणाऱ्या कलावंतांमध्ये एकूण ३० कलावंतांचा सहभाग आहे.

तमिळ भाषिक सफाई कामगारांना मराठा सर्वेक्षणाचे काम

मुंबई महानगरपालिकेने कर्मचारी, अभियंत्यांबरोबरच सफाई कामगारांनाही मराठा सर्वेक्षणाच्या कामाची जबाबदारी सोपविली असून निरक्षर असलेल्या तमिळ भाषिक सफाई कामगारांची या कामासाठी नियुक्ती होताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम नक्की योग्य पद्धतीने होईल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागर‍िकांच्या सर्वेक्षणाचे काम मंगळवार, २३ जानेवारीपासून सुरू झाले. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार मुंबईतही सर्वेक्षण करण्यात येत असून महानगरपालिकेचे अध‍िकारी, कर्मचारी आणि अभियंते शहर, उपनगर जिल्ह्यांमध्ये मराठा सर्वेक्षण करणार आहेत. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार निर्धारित करण्यात आलेले प्रश्न प्रगणक व पर्यवेक्षक नागरिकांना व‍िचारणार आहेत. या माध्यमातून आवश्यक ती माहिती गोळा करण्यात येणार आहे.

शुभमन गिल ठरला 2023 चा सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडू!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी वार्षिक पुरस्कारांची घोषणा केली. कोविडमुळे बीसीसीआयला गेली तीन वर्षे हा पुरस्कार कोणला देता नव्हता, मात्र यंदा बोर्डाने तीन वर्षांचे मिळून हे पुरस्कार दिले आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेपूर्वी बीसीसीआयने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भारतीय कसोटी संघाचे सर्व खेळाडू या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पोहोचले. शुभमन गिलची 2023 साठी भारताचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. मोहम्मद शमीला 2019-20 साठी, रविचंद्रन अश्विन 2020-21 साठी आणि जसप्रीत बुमराह 2021-22 साठी हा पुरस्कार देण्यात आला.

तब्बल १२ वर्षानंतर सैफ अन् करिना दिसणार एकत्र! कपलनं दिले नव्या शो चे संकेत

बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रेटी जोडी करिना कपूर आणि सैफ अली खान हे आता तब्बल १२ वर्षानंतर एकत्र दिसणार आहेत. त्यांनी २०१२ मध्ये एजंट विनोदमध्ये एकत्र काम केले होते. त्यानंतर ते पुन्हा त्यांनी एकत्रित स्क्रीन शेयर केली होती. त्यांच्या आगामी प्रोजेक्ट विषयी ऐकून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.करिनाचा प्रोजेक्ट चाहत्यांसमोर येतो आहे. टाटा प्ले च्या शओ नाऊ बिजिंग नावाची मालिका लवकरच व्हायरल होणार आहे. २४ जानेवारी रोजी त्याचे प्रसारण होणार आहे. त्याची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे.

एलॉन मस्क यांनी भारतासाठी उठवला आवाज

भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा कायमस्वरुपी सदस्य नाही. कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी भारताने अनेकदा आपली दावेदारी सिद्ध केली आहे. यासाठी जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीने भारताला पाठिंबा दर्शवला आहे. टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्सचे मालक एलॉन मस्क यांनी जगातल्या शक्तीशाली देशांना आरसा दाखवत भारताची पाठराखण केली आहे. मस्क म्हणाले, जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असूनही भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व न देणं हा वेडेपणा आहे.एलॉन मस्क यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटलं आहे की, सयुंक्त राष्ट्रांच्या संस्थांमध्ये सुधारणांची आवश्यकता आहे. परंतु, ज्यांच्याकडे ताकद आहे त्यांना त्या जुन्या गोष्टी सोडायच्या नाहीत. पृथ्वीवरील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असूनही भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व दिलेलं नाही. हा सगळा वेडेपणा आहे. परिषदेत आफ्रिका खंडातील देशांसाठी एक जागा असायला हवी.

राक्षसांचा वध करण्याची वेळ आली, उद्धव ठाकरे कडाडले; नाशिकच्या सभेतून भाजपवर घणाघात

ठाकरे गटाने नाशिकमध्ये जाहीर सभा घेतली. दार उघड बये जार उघड, अशी मोहीम ठाकरे गटाने हाती घेतली आहे. राक्षसांचा वध करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गोधंळ घालायचाय, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदारल टीका केली. आमची सत्ता आली की सत्ता टंगळ्या घालून तुमच्या गळ्याच घालतो, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. भाजप भेकडांची पार्टी आहे, असे ठाकरे म्हणाले.महाराष्ट्राच्या भवानीला मी आज साद घालतोय, बये दार उघडं! ज्या ज्या वेळेला धर्मावर अधर्माच संकट आलं तेंव्हा भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम आणि आमच्या भवानी मातेने वेगवेगळे अवतार धारण करून त्या राक्षसांचा वध केला आहे. तीच वेळ आता आली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

SD Social Media

9850603590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.