काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशभरात भारत जोडो यात्रा सुरू आहे. मुंबईमध्ये 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी ही यात्रा काढण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेत शिवसेना सहभागी होणार का? असाल सवाल अनेकांना पडला आहे. यावर नाना पटोले यांनी आता महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईमध्ये होणाऱ्या भारत जोडो यात्रामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना सहभागी व्हावी यासाठी खुद्द नाना पटोले यांनी पुढाकार घेतला आहे. काँग्रेसकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेशी पत्रव्यवहार करणार असल्याचं नाना यांनी जाहीर केलं आहे. अशात आता राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेत सहभागी होतात का? हे येणारा काळच सांगणार आहे.
देशात काँग्रेसने भारत जोडो अभियान हाती घेतलं आहे. राहुल गांधी स्वतः या यात्राचं नेतृत्व करीत आहेत. त्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसही मोठ्या ताकतीने कामाला लागली आहे. ही भारत जोडो यात्रा मुंबईमध्येही होणार असून त्यासाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ठिकठिकाणी कॉर्नर बैठका घेऊन भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करत आहेत.
दरम्यान शिवसेनेने काँग्रेसच्या या प्रस्तावावर सावध भूमिका घेतली आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं शिवसेना नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. भारत जोडो यात्रेबाबत शिवसेनेच्या नेत्यांशी काँग्रेस नेत्यांची चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेबाबत उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे शिंदे आणि भाजपचंही लक्ष असणार आहे.