गुंतवणुकीचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. पारंपरिक पर्यायांपैकी आरडी अर्थात रिकरिंग डिपॉझिटमध्ये अनेक जण गुंतवणूक करतात. तसंच सध्या म्युच्युअल फंड एसआयपीमधल्या गुंतवणुकीवरही अनेकांचा भर आहे. आकडेवारीही तसं सांगते. ऑगस्ट 2022मध्ये 12,693 कोटी रुपयांची गुंतवणूक म्युच्युअल फंडच्या एसआयपी अर्थात सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये झाली. म्युच्युअल फंडाच्या इतिहासात एखाद्या महिन्यात झालेली ही सर्वांत मोठी गुंतवणूक आहे. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना वर्षानुवर्षांच्या गुंतवणुकीचे काय फायदे असतात हे कळलं आहे. म्युच्युअल फंड व्यतिरिक्त रिकरिंग डिपॉझिट या पर्यायातही गुंतवणूकदार पद्धतशीरपणे गुंतवणूक करू शकतो. इथे जोखीमही कमी असते. तुमच्या बँकेमार्फत ही गुंतवणूक करता येते. गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये की रिकरिंग डिपॉझिटमध्ये करणं हा चांगला पर्याय असू शकेल, हे जाणून घेऊ या.
आरडी आणि एसआरपी हे दोन्हीही नियमित गुंतवणुकीच्या नियमावर आधारित असतात. दोन्हीमध्ये भरपूर लवचिकता असते. एसआयपी किंवा आरडी कधीही बंद करून पैसे काढता येऊ शकतात. काही बँका मात्र वेळेआधी पैसे काढल्यास दंड लावतात. “दोन्हीमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी नियमितपणा ठेवला पाहिजे, कारण हप्ते चुकले तर ते बंद होऊ शकतं व पुन्हा नव्याने सुरू करावं लागू शकतं,” असं बँकबझार डॉट कॉमचे सीईओ आदिल शेट्टी यांचं मत आहे.
लवचिकता
एसआयपीमध्ये लवचिकता अधिक असते. कारण यात दररोज, आठवड्याला, दर पंधरा दिवसांनी, महिन्यानं, दर तिमाहीत किंवा दर वर्षाला गुंतवणूक करू शकता. आरडीमध्ये मात्र तसं नसतं. एसआयपीच्या माध्यमातून इक्विटीमध्ये गुंतवणूक करणंही म्युच्युअल फंडमध्ये शक्य असतं. “एसआयपीमध्ये गुंतवणूक करणं हा इक्विटी मार्केटमध्ये सहभागी होण्याचा चांगला पर्याय आहे. कारण यात रुपयाची सरासरी किंमत मिळते. नियमित मासिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा हा उत्तम मार्ग आहे,” असं प्लॅन रूपी इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसचे संस्थापक अमोल जोशी यांचं म्हणणं आहे.
“थोडक्यात तुम्ही 5 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांसाठी एसआयपीमध्ये गुंतवणूक केली असेल, तर त्यातून फायदा अधिक होऊ शकतो,” असं शेट्टी यांचं म्हणणं आहे. हा परतावा बाजारावर अवलंबून असल्यानं तो कमी-जास्त होऊ शकतो, ही गोष्ट मात्र ध्यानात ठेवली पाहिजे.
आरडीमधली गुंतवणूक ठराविक काळासाठी केलेली असते. ती मध्येच मोडता येत नाही, तर एसआयपीमधून कधीही पैसे काढता येतात व एसआयपी बंदही करता येते. केवळ इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्समधल्या (ELSS) एसआयपींनाच तीन वर्षांची मुदत असते. शक्यतो ईएलएसएस फंडव्यतिरिक्त इतर एसआयपीजना मुदतीचं बंधन नसतं. काही एसआयपीजवर मात्र वर्षाच्या आत पैसे काढल्यास बंद करताना दंड भरावा लागू शकतो, असं शेट्टी यांचं म्हणणं आहे. “एसआयपी भांडवलाची हमी देत नाही. कोविड काळात पाहिल्याप्रमाणे, बाजारातल्या स्थितीमुळे तुमची बचत वाढण्याआधी थोड्याच कालावधीत कमी होऊ शकते,” असंही त्यांनी सांगितलं.
आरडीतल्या पैशांवर स्लॅबनुसार कर भरावा लागतो. मुद्दल किंवा व्याज दोन्हींवरही करातून सूट मिळत नाही. आरडीवर मिळणारं व्याज हे चलनवाढीच्या खाली राहते. कर व त्यानंतर हा परतावा नकारात्मक असू शकतो. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा योग्य पर्याय असू शकत नाही.
परताव्याची हमी
सामान्यपणे आपल्याला परताव्याचा खात्रीशीर पर्याय हवा असतो. जोखीम पत्करण्याची तयार नसेल, तर असं वाटू शकतं. तेव्हा तुमची परताव्याची अपेक्षाही कमी असली पाहिजे. “आरडीमध्ये भांडवलाची हमी मिळते. थोड्या कालावधीसाठी बचत करताना हे महत्त्वाचं असतं,” असं शेट्टी यांचं मत आहे.
सेंट्रल बँकेची उपकंपनी असलेलं द डिपॉझिट इन्श्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन आरडीमधील 5 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीची हमी देतं, असं जोशी यांचं म्हणणं आहे. एसआयपीमध्ये अशा पद्धतीची हमी मिळत नाही. दुसरीकडे एसआयपीमधला परतावा बाजाराशी निगडित असतो. बाजाराच्या खाली-वर जाण्यावर परतावा कमी–जास्त मिळतो. दीर्घ कालावधीसाठी इक्विटी फंड हे डेट फंडापेक्षा चांगले ठरतात.
करातून सूट मिळवण्यासाठी आरडी हा चांगला पर्याय नसतो. दर महिना 10 हजार रुपयांची गुंतवणूक 6 टक्के वार्षिक व्याजदरानं 5 वर्षांसाठी केली, तर 97 हजार रुपयांइतकीच रक्कम आरडीमध्ये जमा होते, तर डेट फंडामध्ये 1.26 लाख रुपये मिळू शकतात. आरडीमधल्या व्याजावर कर लावला जातो. त्याशिवाय बँका टीडीएसही कापतात. “हा टीडीएस तुमच्या व्याजावर लावला जातो. त्यामुळे टीडीएस कापून शिल्लक राहील तेवढंच व्याज मिळतं,” असं ट्रूवर्थ फिनसल्टंट्सचे सीईओ ट्रिवेश शाह यांचं म्हणणं आहे.
थोडक्यात ज्या गुंतवणूकदारांना जोखीम स्वीकारण्याची भीती वाटते. पारंपरिक गुंतवणुकीवर ज्यांचा विश्वास असतो, त्यांनी आरडीचा पर्याय निवडावा. खरं तर नुकतंच नोकरीला लागलेल्यांनीही आरडीमध्ये गुंतवणूक करून थोड्या कालावधीसाठी बचत करायला हरकत नाही, असं अमोल जोशी यांना वाटतं. ज्यांना आर्थिक उत्पादनांविषयी भरपूर माहिती आहे व ज्यांची जोखीम पत्करायची तयारी आहे, त्यांनी एसआयपीमध्ये गुंतवणूक करावी. “पहिल्यांदा किती काळासाठी गुंतवणूक करायची आहे, ते गुंतवणूकदारांनी ठरवावं. त्यानुसार गुंतवणुकीचं साधन निवडावं,” असं मायमनीमंत्राचे संस्थापक राज खोसला याचं मत आहे. ज्यांना दीर्घ काळासाठी गुंतवणूक करायची आहे, त्यांनी म्युच्युअल फंडच्या एसआयपीचा पर्याय निवडावा, असंही त्यांना वाटतं.
गुंतवणूक करताना कालावधी, जोखीम पत्करण्याची तयारी व आपलं उद्दिष्ट यांच्या आधारावर एसआयपी किंवा आरडी यापैकी एकाची निवड करता येऊ शकते.