राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केल्याचा पश्चाताप होत नाही. पण असं सरकार स्थापन करायला नको होतं. ती चूकच होती. शंभर टक्के सांगतो. ती चूकच होती. पण त्याचा पश्चाताप होत नाही, अशी कबुलीच देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अजित पवार यांच्यासोबत पहाटे सरकार स्थापन करण्याच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. ‘त्या गोष्टीचा पश्चाताप होत नाही, पण एवढंच सांगतो असं सरकार करायला नको होतं, ही चूक आहे. शंभर टक्के सांगतो ही चूक असली तरी पश्चाताप होत नाही. कारण ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खूपसला जातो त्यावेळी राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं. त्यामुळे जिवंत राहण्यासाठी जे जे करावं लागतं ते करावं लागतं. कारण राजकारणात तुम्ही मेलात तर मला असं वाटतं त्याला उत्तर देता येत नाही. म्हणून आपल्या पाठित खंजीर खूपसला गेला तर आपण जशास तसं उत्तर दिलं पाहिजे या भावनेतून… ज्या काही भावना होत्या… इमोशन होते… राग होता… त्या मिश्र भावनेतून तो निर्णय घेतला. जेव्हा ही संधी आली तेव्हा आम्ही त्या संधीचा फायदा घेतला,’ असं फडणवीस म्हणाले.
‘अजितदादांसोबत जाण्याचा आमचा हा निर्णय किंवा आमची ही भूमिका आमच्या समर्थकांना आवडली नाही. बाकीच्यांचं सोडून द्या, पण भाजपच्या समर्थकांना ते अजिबात आवडलं नाही. किंबहूना आमच्या समर्थकांच्या मनात माझी जी प्रतिमा होती त्या प्रतिमेलाही बऱ्यापैकी तडा गेला, हे मी मान्य करतो. मला वाटतं ते केलं नसतं तर अधिक चांगलं झालं असतं. पण त्यावेळी मला ते अधिक योग्य वाटलं, हे देखील सांगतो’, असंही ते म्हणाले.
राज्यात आघाडीत बिघाडी होत असल्याचं चित्रं निर्माण होतं. तेव्हा भाजप-राष्ट्रवादी किंवा भाजप-शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चा नेहमी होत असतात. राज्यात असं काही सुरू आहे का? असा सवाल फडणवीस यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा चर्चा सुरू असतात. त्यामुळे मजा येते. आम्ही कधी शिवसेनेसोबत जाणार तर कधी राष्ट्रवादीसोबत जाणार असल्याचं सांगितलं जातं. कधी शिवसेनेचे लोकं आमच्याकडे येणार तर कधी राष्ट्रवादीचे लोकं आमच्याकडे येणार असंही सांगितलं जातं. अशा चर्चा सुरू झाल्याने बरं वाटतं. चर्चेत राहिलं पाहिजे. पण सध्या आमची कुणाशीही कोणतीही चर्चा सुरू नाही. असा कोणताही अजेंडा नाही. सरकार बनविण्याचं असं काही सुरू नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.