आज दि.२५ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील
आरोपींना फाशी नव्हे जन्मठेप

मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी आज मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. हायकोर्टाने तीन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द केली असून शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केलं आहे. २०१३ मधील या प्रकरणातील आरोपींनी फाशीच्या शिक्षेला आव्हान दिलं होतं. घटना घडली तेव्हा लोकांचा रोष अधिक होता. पण कायद्याचा विचार करता हे प्रकरण फाशीचे नाही असं कोर्टाने यावेळी नमूद केलं. आरोपींनी मुंबई सत्र न्यायालयाने ४ डिसेंबर २०१४ ला या सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आव्हान दिलं होतं.

आझाद मैदानातील आंदोलन
अखेर मागे : सदाभाऊ

गेल्या १५ दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलं आहे. सदाभाऊ खोत यांनी यासंदर्भात घोषणा केली असून राज्यभरातील इतर ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत कामगार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असं सदाभाऊ खोत यांनी जाहीर केलं आहे. बुधवारी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढ आणि वेतन हमीसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आज आझाद मैदानातील आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

वानखेडे यांच्या विरोधात वक्तव्य
करण्यास मलिक यांना मज्जाव

एनसीबीचे विभागीय संचलाक समीर वानखेडे यांच्यासंबंधी रोज नवे खुलासे आणि आरोप करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना मुंबई हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. मुंबई हायकोर्टाने नवाब मलिक यांना वानखेडे कुटुंबियांविरोधात ९ डिसेंबरपर्यंत कोणतंही वक्तव्य करण्यास मज्जाव केला आहे. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी एकसदस्यीय खंडपीठाच्या निर्णयाविरोधात मुंबईत हायकोर्टात अपील केली होती. मानहानीच्या दाव्यात खंडपीठाने नवाब मलिकांविरोधात अंतरीम आदेश देण्यास नकार दिला होता.

फरार परमबीर सिंह
गुन्हे शाखेत हजर

गोरेगाव येथे दाखल करण्यात आलेल्या खंडणी वसुली प्रकरणाच्या तपासासंदर्भात तपास यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी परमबीर सिंह आज थेट कांदिवलीमधील गुन्हे शाखेच्या युनिट ११ मध्ये हजर झाले. अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदाच समोर आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना परमबीर सिंह यांनी आपला न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याचं म्हटलं आहे. होय, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार मी इथे तपास कार्यामध्ये सहकार्य करण्यासाठी आलोय. (सध्या) मला कशासंदर्भातही बोलायचं नाहीय. आता मी थेट न्यायालयामध्येच माझी भूमिका मांडणार आहे,” असं परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे.

इतर राज्यातुन येणारा गुटखा रोखण्यासाठी
सीमेवर कठोर तपासणी करा

महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरु आहे. परंतु इतर राज्यातुन येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. गृहमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र करोनाविरोधी लढ्यातील
सर्वात अपयशी राज्य : हिना गावित

जनादेश धुडकावून फसवणुकीने सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारने करोना काळात भ्रष्टाचार, धोरणलकवा आणि ढिसाळपणामुळे महाराष्ट्राला कडेलोटाच्या खाईत लोटल्याने करोनाविरोधी लढ्यातील सर्वात अपयशी राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद झाली आहे,” अशी टीका भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉ. हीना गावित यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. केंद्र सरकारने वेळोवेळी केलेल्या मदतीमुळेच महाराष्ट्र करोनाच्या विळख्यातून सावरू शकला, अन्यथा घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाणी पिऊन करोनाविरोधातील केविलवाणी झुंज सुरूच राहिली असती, असा टोलाही त्यांनी लगावला.

इंग्लिश खाडी मध्ये बोट
बुडाली 31 जणांचा मृत्यू

इंग्लिश खाडीमधून पार होत असताना बुडाल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बोटीमध्ये एकूण ३३ जण प्रवास करत होते. त्यापैकी ३१ जणांचा मृत्यू झाला असून २ जण अद्याप बेपत्ता आहेत. ही बोट बुडाल्याची माहिती मिळताच ब्रिटन आणि फ्रान्स या दोन्ही देशातील सागरी व्यवस्थापनाने संयुक्तपणे स्थलांतरीतांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली. मात्र, त्यात त्यांना यश मिळू शकलं नाही.

भोपाळमध्ये पोलिसांकडून
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटना नॅशनल स्टुडन्ट युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय)च्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचा घेराव करण्याची तयारी केल्यावर मोठा गोंधळ झाला. त्यावर पोलिसांनी एनएसयूआय कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. त्यामुळे भोपाळमधीस रस्त्यांवर चांगलाच गोंधळ उडाला. शिक्षण वाचवा, देश वाचवा मोहिमेअंतर्गत भोपाळमध्ये एनएसयूआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. यासंदर्भात प्रदेश काँग्रेस कार्यालयात बैठक सुरू होती. या बैठकीला माजी मुख्यमंत्री कमलनाथ देखील उपस्थित होते.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.