एसटी कर्मचाऱ्यांची आम्ही सकाळपर्यंत वाट पाहू. त्यानंतर कठोर निर्णय घेऊ, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला. आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये, असे आवाहनही त्यांनी केले. राज्य सरकारने बुधवारी एसटी कर्मचाऱ्यांची घसघशीत वेतनवाढ केली. त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनातून माघार घेत असल्याची घोषणा केली. आता एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप संपला, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, त्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या हाती घेत, विलीनीकरणापर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला. अनेक एसटी कर्मचारीही विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे आंदोलनाचे पुढे काय होणार, असा प्रश्न आहे.
एसटी आंदोलनावर बोलताना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही आमचा लेखाजोखा मांडला आहे. खरे तर मागन्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते. आता कर्मचाऱ्यांना कामावर यायचे आहे. आम्ही उद्या सकाळपर्यंत वाट पाहू. त्यानंतर कठोर निर्णय घेऊ, असा इशारा यावेळी परबांनी दिला. जे संपात राहतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तुटेपर्यंत ताणू नये. त्यानंतर जोडता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
परिवहन मंत्री परब म्हणाले की, अजूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या असतील तर त्यांनी त्या समितीसमोर मांडव्यात. आम्ही उच्च न्यायालय विलीनीकरणार जो निर्णय देईल, ते मान्य करणार आहोत. त्यामुळे यापुढे संप करून जनतेला वेठीला धरू नका, असे आवाहन त्यांनी केली. आंदोलकाचे नेतृत्व सध्या अॅड. गुणरत्न सदावर्ते करत आहेत. त्याबद्दल ते म्हणाले की, माझा संबंध हा कर्मचाऱ्यांशी आहे. त्यांची लिडरशीप कुणी करायची, हा त्यांचा प्रश्न आहे. शिवाय मुंबईतून अपक्ष उमेदवार आपला अर्ज मागे घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून पडळकर-खोतांनी माघार घेतली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी कामागारांचे आंदोलन पुढे सुरूच राहील, असा इशारा दिला आहे. विलीनीकरणाची मागणी त्यांनी लावून धरली आहे. तर सरकारच्या वतीने परिवहन मंत्र्यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. निलंबित कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर यावे. त्यांचे निलंबन रद्द करू, असे आश्वासनही दिले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचीही द्विधा मनस्थिती आहे. उद्या काय होणार, याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. विशेषतः एसटीअभावी कोंडीत सापडलेल्या सर्वसामान्यांना.