महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका न्यायालयाच्या स्थगितीमुळे रखडल्या असल्या तरी राज्यातील सुमारे साडेसात हजार ग्रामपंचायतीसाठी आज, रविवारी मतदान होणार आहे. या निवडणुका पक्षातीत होत असल्या तरी आपापल्या प्रभाव क्षेत्रातील ग्रामपंचायती जिंकण्यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी जोर लावला आहे. मतमोजणी मंगळवार, २० डिसेंबर रोजी होईल. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या व नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका रविवारी होत आहेत.
मतदानाची तयारी पूर्ण झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. मतदानाची वेळ सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यत आहे. त्यासाठी खासगी आस्थापनांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. सरपंचपदासाठी थेट निवडणूक होईल. राज्य निवडणूक आयोगाने ७७५१ ग्रामपंचायतींसाठी अधिसूचना जारी केली होती. परंतु काही ग्रामपंचायती या बिनविरोध तर काहींना स्थगिती देण्यात आली आहे. राज्यातील अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदूरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, वर्धा, ठाणे, वाशिम, यवतमाळ, नांदेड, नाशिक या जिल्ह्यांतील गावांमध्ये मतदान होणार आहे.