शिवप्रतापदिनानिमित्त भरगच्च कार्यक्रम; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खान कबरीलगतचे अवैध बांधकाम हटवून जमीनदोस्त केल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवप्रतापदिन शिंदे-फडणवीस सरकारकडून मोठय़ा उत्साहात आणि भव्य स्वरुपात साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. या सोहळय़ासाठी प्रतापगडावर यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते प्रतापगडावर जरीकाठी भगवा फडकविण्यात येणार आहे. संपूर्ण गडाला दोन दिवस विद्युत रोषणाई , लेझर शो, मशाल महोत्सव, आतषबाजी केली जाणार आहे.

हिंदवी स्वराज्यावर चालून आलेल्या अफझल खानाचा कोथळा बाहेर काढत छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचा वध केला. शिवाजी महाराजांच्या या पराक्रमाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी प्रतापगडावर तिथीनुसार शिवप्रतापदिन शासनाच्या वतीने साजरा केला जातो. यंदा तिथीनुसार तो ३० नोव्हेंबर रोजी प्रतापगडावर साजरा होत आहे.

यंदाच्या शिवप्रतापदिनाचे वैशिष्टय़ म्हणजे जिल्ह्याचे पुत्र व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते किल्ले प्रतापगडावर भव्य असा जरीकाठी भगवा झेंडा फडकविण्यात येणार आहे. या उत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. शिवप्रतापदिनी सकाळी भवानी मातेची पूजा, अभिषेक व आरती त्यानंतर भगवा ध्वजारोहणाचा कार्यक्रम. शिवप्रतिमा पालखी पूजा, मिरवणूक, शिवपुतळय़ास जलाभिषेक, पूजा आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यानंतर पोवाडा, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, मर्दानी खेळ यांचे सादरीकरण असे कार्यक्रमाचे स्वरुप असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.