पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यात आज (२३ नोव्हेंबर) पहाटे चार वाजून चार मिनिटांनी भूकंपाचा मध्यम स्वरूपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. दरम्यान, पहाटे-पहाटे बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये अद्याप कोणतीही मोठी हानी झाल्याचे वृत्त नाही.
सन २०१८ साला पासून या भागामध्ये भूकंपाचे मध्यम व सौम्य धक्के बसण्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेपेक्षा अधिक असणाऱ्या धक्क्यांची संख्या मोजकी आहे. गेल्या वर्षभरापासून भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र आज पहाटे बसलेल्या या मध्यम स्वरुपाच्या धक्क्यामुळे डहाणू व तलासरी तालुक्यातील नागरिक खडबडून जागे झाले.
पालघर जिल्ह्यात बसणाऱ्या भूकंपांच्या धक्क्यांच्या अनुषंगाने राज्य शासनाने अनेक उपाययोजना सुचवल्या होत्या. मात्र भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता व वारंवारता कमी झाल्याने तज्ज्ञ समितीने सुचवलेल्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाले आहे.