आज दि.२२ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७१ हजार उमेदवारांना दिली नोकरीची नियुक्तीपत्रे!

एकीकडे विरोधकांकडून देशातील बेरोजगारीच्या समस्येवरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं जात असताना दुसरीकडे मोदी सरकारनं रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नियुक्तीपत्रे देण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘रोजगार मेळावा’ योजनेचा भाग म्हणून तब्बल ७१ हजार तरुणांना नियुक्तीपत्र दिली आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी नियुक्तीपत्रे देण्यात आलेल्या तरुणांशी संवादही साधला. शिक्षक, प्राध्यापक, नर्स, नर्सिंग ऑफिसर, डॉक्टर, फार्मासिस्ट्स, रेडिओग्राफर्स अशा अनेक तांत्रिक आणि पॅरामेडिकल पदासाठी ही नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.

वादग्रस्त विधानानंतर राज्यपाल दिल्लीत, भाजपच्या वरिष्ठांकडून कोश्यारींची कानउघाडणी?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली. राज्यपालांविरोधात राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. तर शिंदे गट, ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेसनेही राज्यपालांच्या विधानाचा निषेध केला. भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपालपदावरून काढा, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली.

या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. 24 आणि 25 नोव्हेंबर अशा दोन दिवशी राज्यपाल दिल्लीत असतील. उत्तर भारतामध्ये राज्यपाल कोश्यारी यांचे नियोजित कार्यक्रम आहेत. वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपाल पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर जात आहेत, त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते राज्यपालांची कानउघाडणी करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शाळा ग्रामपंचायतीकडे, आठवीपर्यंतच्या परीक्षा सुरू, राज्यात येणारा केरळ पॅटर्न कसा असेल?

नव्याने सत्तेत आलेले शिंदे-फडणवीस सरकार आता शिक्षण क्षेत्रात बदल करण्याची विचार करत आहे. राज्यात शालेय शिक्षणात आता केरळ राज्य मॉडेल आधारीत शिक्षण पद्धती राबवण्याचे सुतोवाच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. यानुसार आठवीपर्यंत बंद करण्यात आलेल्या सराव परीक्षा पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली. यापूर्वी तत्कालीन भाजप सरकारने आठवीपर्यंत कोणालाही नापास न करण्याचं धोरण राबवलं होतं.देशभरात शिक्षण क्षेत्रात ज्या राज्यांनी प्रगती केली आहे, अशा राज्यात आमच्या शिक्षण विभागाने दौरे केले आहेत. त्यात केरळने अनेक प्रयोग शिक्षण विभागात केल्याची माहिती मिळाली. शिक्षण क्षेत्रात केरळने अनेक उपक्रम राबवले आहेत. यातील जे मॉडेल यशस्वी झाले आहेत, ते पुढे नेण्यात येणार असल्याचं केसरकर म्हणाले. केरळ आणि महाराष्ट्र अशी तुलना करता येणार नाही. केरळसोबत पंजाब आणि राजस्थानमधून सुद्धा आम्ही मॉडेल घेणार आहोत. केरळमध्ये शाळा ही ग्रामपंचायतीकडे दिल्या आहेत. विद्यार्थीकेंद्री सुधारणा आम्ही राज्यात करणार असल्याचं मंत्री केसरकर यांनी सांगितलं.

सीमाप्रश्नाच्या बैठकीनंतर 24 तासात महाराष्ट्राला धक्का, ती 40 गावं कर्नाटकात विलीन होणार!

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्ह चिघळण्याची शक्यता आहे. मागच्या दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य शासन संपूर्णपणे सीमा भागातील बांधवांच्या भक्कमपणे पाठीशी उभे असल्याचे सांगितले. यासंदर्भातील कायदेशीर लढाईसाठी एकजुटीने प्रयत्न करीत असून त्यासाठी वरिष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन याची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. यावर आता कर्नाटक सरकारही जोरदार तयारीला लागले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी यासंदर्भात सीमाप्रश्नावर जे वकील लढा देत आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील काही गावे कर्नाटकात विलीन होणार असल्याचेही सांगितलं.

यावेळी बोम्मई म्हणाले की, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जत तालुका कर्नाटकात सामील होण्याचा ठराव मंजूर केला आहे. 40 ग्रामपंचायतींचा समावेश असलेल्या या तालुक्याने महाराष्ट्र सरकार त्यांना पाणी देण्यास असमर्थ असल्याचा ठराव संमत केला. जत तालुक्यातील 40 गावांना अन्यायकारक वागणूक दिली जात असल्याने कर्नाटकात सामील व्हायचे आहे, असे बोम्मई म्हणाले.

गुजरातमध्ये पुन्हा भाजपा? चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा

येत्या १ डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्य्याचे मतदान पार पडणार आहे. याच कारणामुळे येथे प्रचार शिगेला पोहोचला आहे. काँग्रेस, आप पक्षांसह भाजपानेदेखील आपली कंबर कसली आहे. मागील २७ वर्षांपासून येथे भाजपाची सत्ता आहे. असे असताना महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा दावा केला आहे. सध्या गुजरातमध्ये विरोधी पक्षच अस्तित्वात नाही. या निवडणुकीत भाजपा १४५ पेक्षा जास्त जागांवर विजयी होणार आहे. यावेळीदेखील गुजरातमध्ये भाजपाचीच सत्ता येणार आहे, असे बावनकुळे म्हणाले आहेत. ते आज (२२ नोव्हेंबर) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये मोठा बदल

टी-२० विश्वचषक २०२२ विश्वचषक पार पडून फक्त एक आठवडा झाला आहे. परंतु आयसीसीने आता टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेची तयारी सुरु केली आहे. या स्पर्धेच्या यजमान देशांपासून ते संघांच्या फॉर्मेट आणि संख्येपर्यंत सर्व काही ठरले आहे. २०२४ मध्ये होणारा टी-20 विश्वचषक २०२२ पेक्षा खूप वेगळा असेल. आयसीसीने सांगितले आहे की २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होतील आणि स्पर्धेचे स्वरूप देखील पूर्वीपेक्षा वेगळे असणार आहे. अमेरिकेला प्रथमच आयसीसी स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे.टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेतील बाद फेरीचे सामने सुरू होण्यापूर्वी दोन टप्पे असतील. २०२१ आणि २०२२ च्या टी-२० विश्वचषकाचे देखील उपांत्य फेरीपूर्वी दोन टप्पे होते, ज्यात पात्रता फेरी आणि सुपर-१२ टप्पा समाविष्ट होते, परंतु आता असे होणार नाही.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.