कर्नाटकपाठोपाठ तामिळनाडूतही संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. 10 मे पासून 24 मेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर स्टॅलिन यांनी लॉकडाऊन करण्याचा पहिलाच निर्णय घेतला आहे. राज्यातील कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढल्याने स्टॅलिन यांनी हा निर्णय घेतला आहे.
स्टॅलिन यांनी कालच शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. सत्तेत येताच त्यांनी कोरोना संसर्गाची माहिती घेण्यासाठी आढावा बैठक घेतली आणि त्यानंतर आज दोन आठवड्यासाठी राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या थांबताना दिसत नसल्याने रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
तामिळनाडूत शुक्रवारी एकाच दिवशी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. तामिळनाडूत काल 26,465 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 13,23,965 एवढी झाली आहे. गेल्या 24 तासात राज्यात 197 रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यातील कोरोना बळींची संख्या 15,171 वर गेली आहे. राज्यात काल 22,381 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात 1,35,355 सक्रिय रुग्ण आहेत. चेन्नईत काल कोरोनाचे 6,738 नवे रुग्ण आढळल्याने चेन्नईतील कोरोना रुग्णांची संख्या 3,77,042 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 5,081 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कर्नाटकातही कोरोनाचा कहर वाढल्याने मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकात लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लागू केले आहेत. 24 मेपर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. राज्यात 27 एप्रिलपासून संचारबंदी लागू आहे. 12 मे रोजीच संचारबंदी समाप्त होणार होती. त्यापूर्वीच येडियुरप्पा यांनी 10 मे पासून कडक निर्बंध लागू करण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे. या निर्बंधांमधून शासनाने ठरवलेल्या अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. या निर्बंधामुळे राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यू दर रोखण्यात यश येईल, असं सांगितलं जात आहे.