सांगली : माणदेशातील आटपाडीच्या उत्तरेश्वर कार्तिक यात्रेत मेंढय़ांच्या खरेदी-विक्रीमध्ये सुमारे दोन कोटींची उलाढाल झाली. हौसी मेंढपाळांनी आपली जनावरे वाजत, गाजत व सजविलेल्या वरातीच्या रथातून आणली. यंदाच्या बाजारात मेंढय़ाला ३५ लाखांची सर्वोच्च बोली लागली. आटपाडीचे ग्रामदैवत असलेल्या उत्तेरश्वर देवाची दोन दिवसांची कार्तिक यात्रा बुधवारी समाप्त झाली. या निमित्ताने माणदेशात प्रसिध्द असलेल्या शेळी- मेंढीचा मोठा बाजार भरविण्यात आला होता. बाजारात विक्रीसाठी सात ते आठ हजार जनावरे आली होती. मंगळवारी व बुधवारी झालेल्या बाजारात सुमारे दोन कोटींची उलाढाल झाली. या यात्रेपासून माणदेशातील विविध गावच्या यात्रांना सुरूवात होते.
पारंपरिक वाद्ये आणि फटाके वाजवून मोठय़ा उत्साहात मेंढपाळांनी मिरवणूक काढून यात्रेत जनावरे आणली. मेंढय़ा खांद्यावर घेऊन नाचत उत्साहात मेंढय़ा आणल्या गेल्या. सुबराव पाटील या हौशी शेतकऱ्याने लग्नाच्या वरातीच्या रथातून मेंढय़ा यात्रेत आणल्या. यंदा मेंढय़ांची आवक जादा तर शेळय़ा बोकडांची आवक कमी होती. यंदाच्या बाजारात मेंढय़ाला ३५ लाखांची सर्वोच्च बोली लागली. मेंढपाळांनी खास प्रजननासाठी संगोपन केलेल्या मेंढय़ांची किंमत १० ते २५ लाख सांगितली. सांगोला तालुक्यातून आणलेल्या एका मेंढय़ाची किंमत ७८ लाख रुपये सांगण्यात आली. मात्र, ग्राहकच मिळाला नाही. यंदाच्या बाजारात सुमारे दोन कोटींची उलाढाल झाली असली तरी सरासरी दीड लाखाने विक्री झाली.