आज दि.९ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

सिडनीत किवींचा धुव्वा, आता मेलबर्नमध्ये खरंच होणार भारत-पाकिस्तान फायनल?

आयसीसी स्पर्धेच्या मैदानात पाकिस्ताननं न्यूझीलंडवर पुन्हा एकदा वर्चस्व गाजवलं. बाद फेरीत पाकिस्तानला हरवण्यात आज न्यूझीलंड पुन्हा अपयशी ठरली. सिडनीच्या मैदानात सेमी फायनलमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्ताननं न्यूझीलंडचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवून तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपची फायनल गाठली. याआधी 2007 आणि 2009 मध्ये पाकिस्तानी संघ टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचला होता.

या सामन्यात डॅरिल मिचेल (53) आणि केन विल्यमसनच्या (46) खेळीमुळे न्यूझीलंडनं पाकिस्तानसमोर 152 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानच्या तुफानी खेळीमुळे पाकिस्ताननं हे आव्हान शेवटच्या ओव्हरमध्ये पार केलं. यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये बाबर आणि रिझवान ही भरवशाची जोडी फ्लॉप ठरली होती. पण सेमी फायनलच्या निर्णायक मुकाबल्यात हे दोघंही पुन्हा फॉर्मात आले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 105 भागीदारी साकारत पाकिस्तानचा विजय सोपा केला. बाबरनं 53 तर रिझवाननं 57 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या हॅरिसनं 30 धावांचं मोलाचं योगदान दिलं.

संजय राऊतांसह प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर, ईडीला मोठा धक्का

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी गेल्या 5 महिन्यांपासून ऑर्थर रोड जेलमध्ये असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयाने जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला होता. पण अखेर आज संजय राऊत यांना  जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. 2 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे राऊत हे आजच जेलबाहेर येणार आहे. संजय राऊत यांच्यासोबत प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.  ईडीने मात्र दोघांच्या जामिनावर अंमलबजावणीसाठी 1 आठवडा स्थगिती मागितली आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या जामीनाला विरोध करणारी ईडीची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर, या विरोधात ईडी उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अखेर दीपाली सय्यद शिंदे गटात, मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीआधी रश्मी ठाकरेंवर केली टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाळासाहेबांची शिवसेना गटात इन्कमिंग सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून दीपाली सय्यद यांचं नाव चर्चेत आले होते. अखेर दीपाली सय्यद या शिंदे गटात सामील होणार आहे. सय्यद या आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझा शिंदे गटात प्रवेश होत आहे. त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. या भेटीमध्ये शिंदे गटात प्रवेश कधी करायचा? यावर चर्चा होणार असल्याची माहिती दीपाली सय्यद यांनी दिली आहे. तसंच येत्या शनिवारपर्यंत आपला शिंदे गटात प्रवेश होईल असंही त्यांनी म्हटलं आहे. आज दीपाली सय्यद या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत, मात्र अद्यापही त्यांना सीएमओ कार्यालयाकडून मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळी दिली गेली नसल्याची माहिती समोर येत आहे.

मराठी माणूस पुन्हा ‘सर्वोच्च’पदी, डी. वाय चंद्रचूड देशाचे 50 वे सरन्यायाधीश

देशाच्या सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा मराठी माणसाचा ठसा उमटला आहे. न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड यांनी देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. सरन्यायाधीश लळीत आज सरन्यायाधीश म्हणून निवृत्त झाले आहे. आता त्यांच्या जागी डी.वाय चंद्रचूड विराजमान झाले आहे. पुढील दोन वर्ष ते सरन्यायाधीश असणार आहे.

आज राष्ट्रपती भवनामध्ये छोटेखानी समारंभ पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चंद्रचूड यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली.

एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय! टेस्ला कंपनीचे ३.९५ अब्ज डॉलर्सचे शेअर्स विकले

ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटचा मालकीहक्क मिळवलेल्या अब्जाधीश एलॉन मस्क यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. एकीकडे ट्विटर खरेदीसाठी त्यांनी तब्बल ४४ अब्ज डॉलर्स मोजलेले असताना दुसरीकडे त्यांनी इलेक्ट्रिक कार निर्मिती करणाऱ्या टेस्ला या कंपनीचे तब्बल ३.९५ अब्ज डॉलर्स किमतीचे १९.५ दशलक्ष शेअर्स विकले आहेत.एलॉन मस्क यांनी त्यांच्या टेस्ला या कारनिर्मिती करणाऱ्या कंपनीचे तब्बल १९.५ दशलक्ष शेअर्स विकले आहेत. या शेअर्सची किंमत ३.९५ अब्ज डॉलर्स आहे. मस्क यांच्याकडे टेस्ला कंपनीचे सर्वाधिक शेअर्स आहेत. मात्र काही शेअर्स विकण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे पडसाद भांडवली बाजारात उमटले.

‘देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे, कारण…’; नितीन गडकरींकडून माजी पंतप्रधानांचं कौतुक

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं खुलेआम कौतुक केलं. गडकरी म्हणाले की, आर्थिक सुधारणांसाठी देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे. गडकरी मंगळवारी TIOL पुरस्कार 2022 कार्यक्रमाला संबोधित करत होते. हा कार्यक्रम ‘TaxIndiaOnline’ पोर्टलने आयोजित केला होता.

भारतातील गरीब लोकांना लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने उदार आर्थिक धोरणाची गरज असल्याचंही केंद्रीय मंत्री म्हणाले. मनमोहन सिंग यांनी 1991 मध्ये अर्थमंत्री म्हणून सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांनी भारताला एक नवी दिशा दिली, ज्यामुळे उदारमतवादी अर्थव्यवस्था झाली, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

कोट्यवधी रुपयांची अफरातफर करणाऱ्या नीरव मोदीला मोठा दणका मिळाला आहे. नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच नीरव मोदीचं भारतात प्रत्यर्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. हिरे व्यापारी नीरव मोदीबाबत ब्रिटन हायकोर्टाने याचिका फेटाळली आहे.

डिसेंबर 2019 मध्ये विशेष पीएमएलए न्यायालयाने नीरव मोदीला फरार आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018 नुसार फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केलं होतं. त्यानंतर तो लंडनला पळून गेला. तीन वर्षांपूर्वी नीरव मोदीला ब्रिटनच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी 13 मार्च 2019 रोजी लंडनमधून अटक केली होती.

आता धुरळा ग्रामपंचायत निवडणुकांचा, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

राज्यात महाविकास आघाडी पायउतार झाल्यनंतर मागच्या 15 दिवसांपूर्वी पहिल्या टप्पातील 7 हजार पेक्षा जास्त ग्रामपंचातींची निवडणूक पार पडली. यानंतर दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तारीख राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केली आहे. याचबरोबर दुसऱ्या टप्प्यातही 7 हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा जाहीर झाल्या आहेत. या निवणुकांमुळे गावागावात धुरळा उडणार आहे. राज्य निवडणुक आयोगाने परिपत्रक जाहीर करून आचारसंहिताही लागू केली आहे. 18 डिसेंबर मतदानाची प्रक्रिया होणार आहे तर 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

राज्यात पहिल्या टप्प्यात 7600 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या होत्या आता दुसऱ्या टप्प्यात 7700 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये राज्यातील कोल्हापूर, सांगली, नांदेड, अहमदनगर, अकोला अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, बुलडाणा, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नंदुरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, नाशिक, वाशिम, यवतमाळ अशा 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.

अजित पवार खरचं नाराज? नॉटरिचेबल चर्चेवर सुप्रिया सुळेंचा खुलासा

मागच्या दोन दिवसांपूर्वी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या पातळीत टीका केली. या प्रतिक्रीयेचा राज्यातील सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला. दरम्यान या सगळ्यात राज्याचे विरोधी पक्षनेते सुप्रिया सुळे यांचे बंधू अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर शिवीगाळ केली तरी अजित पवारांनी साधं ट्वीट देखील न केल्यामुळे विविध चर्चा रंगल्या आहेत. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झालेला बघायला मिळतोय. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतल्या शिबिरापासून अजित पवार नॉट रिचेबल आहेत.

काही तासांपूर्वी राजकीय पटलावर विरोधी पक्षनेते अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याच्या चर्चेला ओत आला होता. यावर स्पष्टीकरण देताना प्रत्येकाला त्याचे एक पर्सनल आयुष्य असते, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी या चर्चेवर पडदा टाकला. याविषयी पुढे बोलताना त्या म्हणाल्या, अजित पवार त्यांच्या वैयक्तिक कामासाठी ते नॉट रिचेबल असू शकतात. म्हणून याचा अर्थ काही राजकीय असेल असे होऊ शकत नाही. असे मत सुळे यांनी व्यक्त केले.

टी२० क्रमवारीत सूर्यकुमार अव्वलस्थानी कायम! विराट, केएल आणि अर्शदीप सिंग यांचे प्रमोशन

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने नुकतीच फलंदाजी आणि गोलंदाजीची क्रमवारी जाहीर केली आहे. ज्यामध्ये ‘मिस्टर ३६०’ सूर्यकुमार यादवने टी२० क्रमवारीत आपले अव्वलस्थान कायम राखले, तर दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता सूर्या आणि रिझवानमध्ये ३९ गुणांचा फरक आहे. याचा अर्थ आता रिजवानसाठी सूर्याला हरवून मागे टाकणे खूप कठीण जाणार आहे.  सूर्यकुमार यादव याच्याबरोबर भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि उपकर्णधार केएल राहुल यांना क्रमवारीत फायदा झाला आहे. तसेच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली टी२० विश्वचषक २०२२च्या हंगामात उत्तम फॉर्ममध्ये आहे. यामुळे त्याने आयसीसी टी२० क्रमवारीत ११वे स्थान कायम राखले आहे. अर्शदीपला एका स्थानाचा फायदा झाला असून त्याने गोलंदाजीत २३वे स्थान गाठले आहे. या स्पर्धेत अर्शदीपने त्याच्या गोलंदाजींने चाहत्यांना भूरळ घातली आहे. त्याने पहिलाच टी२० विश्वचषक खेळताना ५ सामन्यात १० विकेट्स घेतल्या आहेत.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.