हिंदूस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) ‘हिंदूस्थान लीड इन फायटर ट्रेनर’ (एचएलएफटी)-४२ या लढाऊ विमानावरील हनुमानाचे चित्र हटविण्यात आले आहे. येथे भरलेल्या ‘एअरो इंडिया २०२३’ प्रदर्शनातील विमानावरील या चित्रामुळे वाद निर्माण झाला होता.
‘एचएलएफटी-४२’ या लढाऊ विमानावर ‘वादळ येत आहे’ अशा घोषणेसह हनुमानाचे चित्र लावण्यात आले होते. यावर विरोधकांनी टीका केली होती. एका विशिष्ट धर्माचा प्रचार करण्याच्या हेतूने चित्र लावण्यात आल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर हे चित्र हटविण्याचा निर्णय एचएएलने घेतला. ‘एचएफ-२४ मारुत’ हे लढाऊ विमान होते. त्यावरून हे चित्र घेतले होते. लढाऊ विमानाची ताकद दाखवणे हा यामागील उद्देश होता, असे कंपनीच्या अधिकाऱ्याने नमूद केले. दरम्यान, कोणत्याही खास हेतूने हे चित्र लावण्यात आले नव्हते आणि ते काढण्यामागेही कोणता खास उद्देश नाही, असे ‘एचएएल’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सी. बी. अनंतकृष्णन यांनी स्पष्ट केले.