भूकंपबळी ३५ हजारांवर

तुर्कस्तान व सीरियात गेल्या सोमवारी झालेल्या विनाशकारी भूकंपाचा फटका बसलेल्या तीन प्रांतांमध्ये ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बचावकर्ते अजूनही अविरत काम करत आहेत. ६ फेब्रुवारी रोजी आलेल्या या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या ३५ हजारांवर पोहोचली आहे. अजूनही मृतदेह सापडत असल्याने मृतांची संख्या अजून वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.तुर्कस्तानमध्ये मृतांची अधिकृत संख्या सोमवापर्यंत ३१ हजार ६४३ झाली होती.  दमास्कसमध्ये सीरियन आरोग्य मंत्रालयाने सांगितले, की बंडखोरांच्या ताब्यातील वायव्य भागात मृतांची संख्या दोन हजार १६६ वर पोहोचली आहे. तर ‘व्हाईट हेल्मेट्स’ या बचाव गटाच्या म्हणण्यानुसार, सरकारच्या ताब्यात असलेल्या भागात एक हजार ४१४ जण मृत्युमुखी पडले आहेत. सीरियात आतापर्यंत एकूण मृतांची संख्या तीन हजार ५८० झाली आहे.

भूकंपामुळे तुर्कस्तानचे दहा प्रांत व वायव्य सीरियातील मोठा परिसर उद्ध्वस्त झाला आहे. उद्ध्वस्त झालेल्या शहरांतही वाचलेल्यांना प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे, अनेकांना ऐन थंडीत बाहेर झोपावे लागत आहे. परिसरातील बहुतांश पाणीपुरवठा ठप्प आहे. पर्यावरण व नागरी मंत्री म्हणाले, की तुर्कस्तानच्या ४१ हजार ५०० हून अधिक इमारती नष्ट झाल्या आहेत. अनेक नुकसानग्रस्त व धोकादायक झालेल्या इमारती पाडाव्या लागतील. या इमारतींच्या खाली अद्याप मृतदेह आहेत आणि बेपत्ता झालेल्यांची संख्या अस्पष्ट आहे.

अदियामन प्रांतात, बचाव कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मोहम्मद कैफर सेटिन नावाच्या १८ वर्षीय तरुणापर्यंत पोहोचू शकले.  १९९ तासांनी त्याला  प्रकाश दिसला.  मंगळवारी, मध्यवर्ती कहमनमारसमध्ये एका ढिगाऱ्यातून आणखी दोन जणांना वाचवण्यात आले. त्यात एक किशोरवयीन मुलगा आहे.

‘दफनासाठी मृतदेह तरी मिळू द्या..’

भूकंपाचा मोठा फटका बसलेल्या हताय शहरातील सेंगुल अबालियोग्लू हिने आपली बहीण आणि चार पुतण्यांना गमावले. तिने प्रसारमाध्यमांना आर्ततेने विनवले, की तिचे नातलग मृत किंवा जिवंत असले तरी काही फरक पडत नाही. आमच्या नातलगांचे मृतदेह मिळाल्यास किमान त्यांचे दफन आम्हाला करता येईल. तिचे कुटुंब जिथे असू शकते त्या ढिगाऱ्याजवळ ती थांबली आहे. ढासळलेल्या इमारतीतून  ढिगाऱ्यातून  तिने सोमवारी आवाज ऐकला. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे परतल्यावर हे शोधकार्य थांबेल, अशी भीतीही तिने व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.