आज दि.३१ आॕक्टोबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

सुंदरबनी सेक्टरमध्ये भूसुरुंग
स्फोट , दोन जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या नौशेरा-सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंग स्फोट झाला. या स्फोटात दोन जवान शहीद झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंगावर गस्त घालत असताना स्फोट झाला आणि त्यात एक अधिकारी आणि एक जवान शहीद झाला. माहिती मिळताच इतर जवान घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना लष्कराच्या रुग्णालयात दाखल केले. जखमी तिघांपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या घटनेची एका वरिष्ठ अधिकाऱ्याने देखील पुष्टी केली आहे.

प्रवासी वाहन दरीत कोसळले
13 जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये आज एक भीषण अपघात घडल्याचे समोर आले. डेहराडून जवळ चकराता येथे एक प्रवासी वाहन ४०० मीटर खोल दरीत कोसळले आणि या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. दोन जण जखमी झाले आहेत. बायला-पिंगुवा मार्गावरील गावापासून २०० मीटर अंतरावर वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने प्रवाशांनी भरलेले हे वाहन सुरक्षा भिंत तोडून थेट ४०० मीटर खोल दरीत कोसळले. हा भीषण अपघात सकाळी १० वाजता घडला.

1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान काही
जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

राज्यातील अनेक ठिकाणी थंडीची चाहुल लागणार असताना आता पावसाचं पुन्हा एकदा संकट ओढवलं आहे. 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

तर पोलीस स्टेशनमध्ये
तंबू लावू : राकेश टिकैत

शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम असून, दिल्लीच्या सीमेवर त्यांनी ठिय्या दिलेला आहे. दरम्यान, आज शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रशासनाला एक सूचक इशारा देखील दिला आहे. प्रशासन जेसीबीच्या सहाय्याने येथील तंबू हटवण्याचा प्रयत्न करत असल्याची आम्हाला माहिती मिळाले आहे. जर त्यांनी तसे केले तर शेतकरी पोलीस स्टेशन, डीएम कार्यालयात तंबू लावतील.”, असं राकेश टिकैत म्हणाले आहेत.

सरकारला मान्यता न दिल्यास परिणाम
भोगावे लागतील : तालिबान

तालिबानने अफगाणिस्तानमधील आपल्या सरकारला जागतिक मान्यता देण्यासाठी इशारा दिलाय. अमेरिकेसह जगातील इतर देशांनी तालिबान सरकारला मान्यता न दिल्यास आणि जागतिक पातळीवर अफगाणिस्तानचे पैसे गोठवण्याचा निर्णय मागे न घेतल्यास याचे परिणाम भोगावे लागतील, असं मत तालिबानने व्यक्त केलंय. तालिबानने अफगाणिस्तानच्या सैन्याचा पराभव करत सरकार स्थापनेची घोषणा केल्यापासून जगातील कोणत्याही देशाने त्यांच्या सरकारला मान्यता दिलेली नाही.

ज्येष्ठ व्हॉयलिन वादक
प्रभाकर जोग यांचे निधन

ज्येष्ठ व्हॉयलिन वादक प्रभाकर जोग यांचे निधन पुणे येथे निधन झाले आहे. ते 89 वर्षांचे होते. गाणारं व्हॉयलिन कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हॉयलिन वादनाला त्यांनी लोकप्रियता मिळवून दिली. जोग यांच्या व्हायोलिनच्या सुरांनी प्रसिद्ध गीतरामायणालादेखील समृद्ध केले. व्हायोलिनवादनाच्या माध्यमातून त्यांनी तब्बल 6 दशकं संगितक्षेत्राची सेवा केली. त्यांना 2017 साली गदिमा पुरस्कार, 2015 साली गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळाला होता.

उर्मिला मातोंडकरला
कोरोनाची लागण

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना अभिनेत्री आणि शिवसेना नेता उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी सकाळी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनाच्या विळख्यात सापडल्याची माहिती दिली. त्यांनी स्वतःला राहत्या घरात क्वारंटाईन करून घेतलं आहे. त्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वांनी स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

सात कोटींचे अमली पदार्थ
उत्तर महाराष्ट्रात जप्त

गेल्या काही महिन्यात नाशिक पोलिसांनी तडाखेबंद कारवाई करत तब्बल 7 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यात ब्राऊन शुगर, चरस, गांजा, कुत्ता गोळी, गुटखा आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या प्रकरणी एकूण 171 आरोपींना तुरुंगाची हवा खायला पाठवले आहे.

नोव्हेंबरपासून बँकेतून पैसे
काढण्याच्या नियमांत बदल

नोव्हेंबरपासून अनेक नियम बदलणार आहेत. हे सर्व नियम आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करतात, त्यातील बदलांचा आपल्या खर्चावर मोठा परिणाम होऊ शकतो. एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल असोत किंवा बँकेशी संबंधित नियम, त्यांचा थेट संबंध आपल्या आयुष्याशी असतो. त्यामुळे 1 तारीख येण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या जेणेकरून बदल वेळेवर आणि योग्य पद्धतीने हाताळता येतील. या चार बदलांमध्ये एलपीजी वितरण प्रणालीतील बदल, ठेवी आणि पैसे काढण्याबाबतचे बँक नियम, एलपीजीच्या किंमती आणि रेल्वेचे वेळापत्रक यांचा समावेश आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.