आज दि.९ एप्रिल च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

‘सिल्वर ओक’वरील आंदोलन प्रकरण; 109 आंदोलकांना मोठा झटका, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

एसटी कर्मचारी 8 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक बाहेर जमा झाले. यानंतर या आंदोलकांनी थेट दगडफेक आणि चप्पलफेक करत शरद पवारांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह एकूण 110 जणांना अटक केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून इतर 109 आंदोलनकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.109 आंदोलनकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांच्या जामीनाचा अर्ज मोकळा झाला होता. त्यांनी जामीनासाठी अर्ज सुद्धा केला मात्र, त्यांचा हा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. त्यामुळे आता वरच्या कोर्टात या आंदोलनकर्त्यांना अर्ज करावा लागणार आहे. उद्या रविवार असल्याने सोमवारीच आता त्यांना जामीनासाठी अर्ज करावा लागणार आहे.

कोणी कायदा हातात घेत असेल तर,
शासन हातावर हात ठेवून बसणार नाही

राज्याचे परिहनमंत्री अनिल परब यांना आज आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांना सूचक इशारा दिला. “कुणाच्या तरी भडकवण्यावरून जर कोणी कायदा हातात घेत असेल तर राज्य शासन हातावर हात ठेवून बसणार नाही. असं ते म्हणाले आहेत.” राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानाबाहेर काल काही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याने व चप्पला फेकल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर घडामोडींना वेग आला व रात्री आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाली.

सिल्व्हर ओकवर जाण्या पाठिमागचं
कारण काय? : अजित पवार

आधी जल्लोष करणाऱ्या आंदोलक कर्मचाऱ्यांनी नंतर सिल्व्हर ओकवर का धाव घेतली? असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला आहे. “मला एका गोष्टीची गंमत वाटते. उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर तिथे गुलाल उधळला गेला. तिथे मिठाई वाटली गेली. खूप मोठं यश मिळवलं असं दाखवलं गेलं. मग एवढं सगळं होत असताना पुन्हा सिल्व्हर ओकवर जाण्याचं काहीच कारण नव्हतं. त्याच्या पाठिमागचं कारण काय? त्यातल्या एकानं म्हटलंय की १२ तारखेला बारामतीला जाणार”, असं अजित पवार म्हणाले.

न्यायालयांना बदनाम करण्याची
नवी प्रवृत्ती आहे : एन. व्ही. रमण

न्यायालयाचा निकाल आपल्या आवडी-अपेक्षेनुसार नसेल तर सरकारकडून न्यायाधीशांना बदनाम करण्याच्या ‘नव्या प्रवृती’ला सर्वोच्च न्यायालयाने दुर्दैवी असे संबोधले. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने वरील निरीक्षण छत्तीसगड सरकारने दाखल केलेल्या दोन स्वतंत्र अपिलांवरील सुनावणीदरम्यान नोंदवले. न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचाही समावेश असलेल्या खंडपीठाने न्यायव्यवस्थेवर करण्यात आलेल्या काही आरोपांवर नाराजी व्यक्त केली. तुम्ही कितीही लढा द्या, ते योग्यच आहे. परंतु न्यायालयांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. मी या न्यायालयातही पाहत आहे. न्यायालयांना बदनाम करण्याची नवी प्रवृत्ती आहे, असे निरीक्षण सरन्यायाधीश रमण यांनी नोंदवले.

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाचे प्रमुख
आकार पटेल यांना देश सोडण्यास मनाई

न्यायालयाच्या परवानगीशिवाय अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाचे प्रमुख आकार पटेल यांनी देश सोडू नये, असे आदेश दिल्लीच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी दिले. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने गुरुवारी आकार पटेल यांच्याविरोधात सीबीआयने काढलेली ‘लुकआऊट नोटीस’ रद्द करून त्यांना परदेश प्रवासाला परवानगी दिली होती. मात्र दिल्लीच्या विशेष न्यायालयाकडून हा निर्णय बदलण्यात आला. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या निकालावर सीबीआयने विशेष न्यायालयात पुनरीक्षण अर्ज दाखल केला.

भारतीय फार स्वाभिमानी
लोक आहेत : इम्रान खान

इम्रान खान यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात भारताचं कौतुक केलं आहे. “मला आज दु:ख देखील होतंय आणि वाईट देखील वाटतंय. आपल्यासोबतच भारत स्वतंत्र झाला. मी इतरांपेक्षा भारताला चांगलं ओळखतो. माझे अनेक मित्र देखील आहेत. क्रिकेटमुळे मला लोकांकडून फार प्रेम मिळालं. मला वाईट वाटतंय की आरएसएसच्या विचारसरणीमुळे आपले चांगले संबंध नाही. मला एक सांगावंसं वाटतं की ते फार स्वाभिमानी लोक आहेत”, असं इम्रान खान म्हणाले.

श्रीलंका संकटात अडकण्यामागे
चीनकडून घेतलेले कर्ज

भारताचा शेजारी देश श्रीलंकेची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तिथे खाण्यापिण्याचा तुटवडा असून आर्थिक विवंचनेने हैराण झालेले लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. श्रीलंकेत अन्नधान्य महागाईचा दर ३० टक्क्यांवर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत सुंदर, समृद्ध जीवन जगणाऱ्या श्रीलंकेवर अचानक संकटाचा डोंगर कसा कोसळला, हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. या गंभीर संकटात श्रीलंका अडकण्यामागे चीनकडून घेतलेले कर्ज हे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यापूर्वी श्रीलंका सरकारने चढ्या व्याजदराने कर्ज घेऊन भरपूर गुंतवणूक केली पण त्यांना त्याचा परतावा मिळाला नाही.

विल स्मिथवर आता
ऑस्करची १० वर्षांची बंदी

हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्यात विल स्मिथ सुत्रसंचालक क्रिस रॉकवर अचानक चिडला आणि त्याने स्टेजवर जाऊन कानशिलात लगावली होती. त्यानंतर विल स्मिथवर ऑस्करने कडक कारवाई केली आहे. विल स्मिथवर आता ऑस्करने १० वर्षांची बंदी घातली आहे.

आफ्रिकेत लोकांच्या फोन लाइन का बंद केल्या जात आहेत?

आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये, लोकांच्या फोन लाईट कट करण्यात येत आहेत. एकट्या नायजेरियामध्ये या सोमवारी तीन चतुर्थांश फोन लाइन बंद झाल्या आहेत. ही काही अचानक घडलेली घटना नाही आणि आफ्रिकेतील केवळ एकाच देशात घडत नाही. येथील अनेक देशांमध्ये गेल्या काही वर्षात सुरक्षेच्या कारणास्तव राष्ट्रीय ओळख क्रमांकासारख्या प्रणालीशी सिम कार्ड लिंक करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. मात्र, गुन्हेगारी कारवायांमुळे सरकारला कठोर पावले उचलावी लागली आहेत.

फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील उमेदवार ली पेनही हिजाबच्या विरोधात

भारतातील हिजाब वाद आता फ्रांसमध्येही पोहोचला आहे. रविवारी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हा मोठा मुद्दा झाला आहे. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मरीन ली पेन यांनी जनतेला आश्वासन दिले आहे. त्या म्हणाल्या की, त्या जर सत्तेत आल्या तर त्या हिजाब घालणाऱ्या मुस्लिमांकडून दंड आकारला जाईल.

फ्लिपकार्ट ची नवी सर्विस, घरबसल्या स्वस्तात ऑर्डर करता येणार औषधं

गेल्या काही वर्षात आणि कोरोना काळापासून ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे. ऑनलाइन शॉपिंगमध्ये आपल्या गरजेचं, आवडीचं सामान घर बसल्या मागवता येतं. त्यासाठी कुठेही न जाता, हवं तितकं सर्च करुन बजेटनुसार खरेदी करता येते. ऑनलाइन शॉपिंग अनेकांसाठी फायद्याचं, वेळ वाचवणारं ठरतं. आता ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टने एक नवी सर्विस सुरू केली आहे. ज्यात तुम्ही घरबसल्या हवी ती औषधं ऑनलाइन मागवू शकता. फ्लिपकार्टने Flipkart Health+ नावाने ही नवी सुविधा सुरू केली आहे. 6 एप्रिल रोजी फ्लिपकार्टने एका नव्या सर्विसची घोषणा केली आहे. एक डिजीटल हेल्थकेयर मार्केटप्लेस Flipkart Health+ असा प्लॅटफॉर्म आहे, जिथे लोक सहजपणे आपल्या गरजेची औषधं स्वस्तात खरेदी करू शकतात. जी औषधं डिलीव्हर केली जातील त्याची क्वॉलिटीही चांगली असेल असा दावा फ्लिपकार्टने केला आहे.

‘सिल्वर ओक’वर आंदोलन करण्यापूर्वी चौघांनी रेकी केल्याचा पोलिसांना संशय, चौघांनाही अटक

शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अनेकांना अटक केली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा हल्ला करण्यापूर्वी चौघांनी सिल्वर ओक येथे रेकी केल्याचा संशय पोलिसांना आहे.
सिल्वर ओक येथे हल्ला करण्याआधी 4 जण येवून गेले होते त्यांनी रेकी केली असावी असा संशय मुंबई पोलिसांना आहे. या चारही जणांना रात्री अटक करण्यात आली आहे. त्यांना देखील आज कोर्टात हजर करण्यात आले.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.