आज दि.१८ आॕगस्ट च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

197 वर्ष जुन्या मुरलीधर मंदिरात जन्माष्टमीची धूम

आज राज्यात सर्वत्र श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. यामुळे भाविकांची श्री कृष्ण मंदिरात दर्शनासाठी गर्दी बघायला मिळत आहे. नाशिक मधील 197 वर्ष जुने मुरलीधर मंदिरात ही भाविकांनी आज सकाळ पासून दर्शनासाठी गर्दी केली असून श्री कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करत आहेत. नाशिकच्या कापड बाजारातील मुरलीधर मंदिर हे पुरातन मंदिर आहे. 1825 साली गणराज महाराजांनी या मंदिराची स्थापना केली आहे. गोदावरीच्या तीरावर हे मंदिर वसलेलं आहे. हे मंदिर लाकडी जुन्या ठेवनीतून बनवलेलं आहे. मंदिरात गेल्यानंतर मन अगदी शांत होत आणि प्रसन्न वाटत. मंदिरात असलेली श्री कृष्णाची मूर्ती अतिशय सुबक आणि आकर्षक आहे. श्री कृष्णाची बालमूर्ती आहे मूर्तीकडे बघितल की श्री कृष्णाचं सावळ गोजिरवानं रूप आठवत. दररोज अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. उत्सव काळात भाविकांची अलोट गर्दी असते, अशी माहिती मंदिरातील पुजारी संदेश संत यांनी दिली आहे.

‘गोविंदांना सरकारी नोकरी मिळणार’, मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत महत्त्वाची घोषणा केली. दहीहंडीच्या उत्साहात सहभागी होणाऱ्या गोविंदा जखमी झाले तर त्यांना विमा मिळेल. तसेच या उत्साहाचं क्रीडा प्रकारात समावेश करुन गोविंदांना शासकीय नोकरीत पाच टक्क्यांच्या कोट्यातून नोकरीचा लाभ घेता येईल, असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. तसेच दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे.

मुंबईसह ठाणे आणि कोकणात उद्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भातही अलर्ट

गेल्या कित्येक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं अक्षरशः थैमान घातलं आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसंच कोकणातही सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस पडला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. त्यात आता हवामान विभागाकडून उद्यासाठी पुन्हा अलर्ट देण्यात आले आहेत. राज्याच्या हवामान विभागानं उद्याच्या पावसासंबंधीचा अंदाज वर्तवला आहे.

उद्या म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे आणि जवळच्या इतर उपनगरीय शहरांमध्ये हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच कोकण आणि कोकण किनारपट्टी भागातही हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

केंद्राची मोठी कारवाई; ‘या’ कारणामुळे लाखो सबस्क्राइबर्स असलेल्या 8 YouTube न्यूज चॅनेलवर बंदी

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अनेक भारतीय आणि पाकिस्तानी यूट्यूब न्यूज चॅनेलवर कठोर कारवाई केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित दुष्प्रचार प्रसार करणारे 8 यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. या चॅनेलमध्ये 7 भारतीय आणि 1 पाकिस्तान आधारित यूट्यूब चॅनेलचा समावेश आहे.हे डेमोक्रेसी टीव्ही, यू अँड व्ही टीव्ही, एएम राजवी, ग्लोरियस पवन मिथिलांचल, सीटॉप 5 टीएच, सरकार अपडेट्स आणि सब कुछ देखो. याशिवाय न्यूज की दुनिया नावाचं पाकिस्तानमधील यूट्यूब चॅनलही ब्लॉक करण्यात आलं आहे.ब्लॉक करण्यात आलेले हे यूट्यूब चॅनेल 114 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत. या चॅनेलचे 85 लाख 73 हजार सदस्य आहेत. या सर्व चॅनल्सवर IT नियम 2021 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या चॅनलच्या माध्यमातून भारताविरोधी खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

रायगडमध्ये आणखी एक बोट आढळली, काही जण पळून गेल्याचा संशय

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरमध्ये एक शस्त्राने भरलेली बोट आढळली आहे. ही घटना ताजी असताना श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगारजवळ आणखी एक बेवारस स्थितीत फुगा बोट आढळली आहे. या बोटीतून काही जण किनाऱ्यावर पळून गेले असा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगारजवळ बोर्ली सागरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बेवारस स्थितीत आणखी एक फुगा बोट संशयस्पदरित्या आढळली आहे. या बोटीतून काही जण किनाऱ्यावर पळून गेले असा संशय व्यक्त केला जात आहे. हरिहरेश्वरमध्ये सापडलेल्या याच बोटीमधील प्रवाशी हे अन्य एका फुगा बोटमधून प्रवास करत दिवे आगार जवळील किनाऱ्यालगत उतरून पळून गेले अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आशिष शेलार आदित्य ठाकरेंविरुद्ध वरळीतून लढणार? शिवसेनेचं चॅलेंज

भाजपने आशिष शेलार यांना मुंबईचं अध्यक्ष केल्यानंतर त्यांनी थेट शिवसेनेला अंगावर घ्यायचं ठरवल्याचं दिसत आहे. आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीत भाजप दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करणार आहे. वरळीच्या जांभोरी मैदानात भाजपने दहीहंडीचं आयोजन केलं आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे एकूण 3 आमदार आहेत. स्वत: आदित्य ठाकरे विधानसभेवर तर सुनिल शिंदे आणि सचिन आहिर विधानपरिषदेवरचे आमदार आहेत. तीन आमदार असूनही वरळीचं जांभोरी मैदान दहीहंडीसाठी मिळवण्यात भाजपला यश आलं.

दहीहंडीवेळी शक्तीप्रदर्शन केल्यानंतर आशिष शेलार वरळीतून आदित्य ठाकरेंच्याविरोधात पुढची विधानसभा निवडणूक लढणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवसेना आमदार सचिन आहिर यांनी आदित्य ठाकरेंना वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान केलं आहे.

RTO अधिकारी निघाला कुबेर, पगारापेक्षा 650 पट जास्त मालमत्ता, 6 अलिशान घरं

देशात अनेक ठिकाणी सध्या छापेमारी सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सध्या धाडसत्र सुरू आहे. जालन्यानंतर आता एका अधिकाऱ्याच्या घरी धाड टाकल्याची माहिती मिळाली. हा ARTO मधील अधिकारी आहे. या अधिकाऱ्याच्या घरी कोट्यवधी रुपये आणि पगारापेक्षा कमाई जास्त अशी तऱ्हा झाली. या अधिकाऱ्याच्या घरी पगारापेक्षा 650 पट अधिक मालमत्ता सापडली आहे.

जबलपूरचे ARTO (प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी) संतोष पॉल यांच्या घरासह अनेक ठिकणी धाड टाकली. या धाडीमुळे एकच खळबळ उडाली. ईओडब्ल्यूच्या पथकांनी एकाच वेळी पॉलच्या शताब्दीपूरम येथील आलिशान पेंटहाऊस आणि गार्हा फाटक येथील त्याच्या वडिलोपार्जित संपत्तीवरही धाड टाकली.

शाळेसमोरून 13 वर्षीय विद्यार्थी बेपत्ता; पुणे रेल्वे स्टेशनवरुन पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुण्यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 13 वर्षांच्या मुलाच्या अपहरणाची घटना उघडकीस आणली. हा विद्यार्थी मंगळवारी त्याच्या शाळेसमोरून बेपत्ता झाला होता. यानंतर तो पुणे रेल्वे स्टेशनवर सापडला.

मुलाच्या वडिलांनी देहू रोड पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची FIR दाखल केली होती. मंगळवारी दुपारी देहू रोड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर बसची वाट पाहत उभा होता. त्यावेळी मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरणकर्त्यांनी आधी मुलाचा चेहरा कपड्याने झाकला आणि त्याचं अपहरण केलं.

ITR रिफंड क्लेम करताना तुम्हाला येऊ शकते नोटीस?

आर्थिक वर्षाच्या शेवटी अनेक महत्त्वाची कामे करावी लागतात. त्यापैकी एक म्हणजे आयकर परतावा भरणं. वेळच्यावेळी इन्कम टॅक्स रिटर्न भरला जात असेल तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो. यंदा 31 जुलै ही आयटीआर भरण्याची शेवटची तारीख होती.

आयकर विभागाकडून सध्या परताव्याची छाननी केली जात असून, ज्या करदात्यांची टीडीएस कपात झाला आहे त्यांना परतावा दिला जात आहे. अनेक करदात्यांना तो मिळत असला तरी काहींना मात्र आयकर विभागाकडून नोटीस पाठवली जात आहे. कर परताव्यात तफावत आढळल्यास अशी स्थिती उद्भवते. ‘झी न्यूज हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलयं.

पूर आला अन् स्मशानभूमीसह प्रेतंही गेली वाहून

मागच्या चार दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. नंदुरबार, नाशिक, जळगाव जिल्ह्यात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे तर पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे.पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान नवापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.. पावसामुळे वाघसेपा गावातील नदीकिनारी असलेली स्मशानभूमी पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. 

दुर्दैवाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये मयत झालेल्या व्यक्तींचे उत्तर कार्य बाकी असताना प्रेत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने गावकऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे. स्मशानभूमी वाहून नुकसान झाल्याच्या सगळ्या प्रकाराला साठवण बंधारा बांधणाऱ्या ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे झाले असल्याचा आरोप वाघसेपा येथील गावकऱ्यांनी केला आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.