मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीचा दौरा अचानक रद्द झाला आहे. मुख्यमंत्र्यांना दिल्ली दौरा रद्द का करावा लागला, याचं कारण मात्र समजू शकलेलं नाही. पण शिंदेंचा दिल्ली दौरा रद्द झाल्यामुळे राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा लांबणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे बरेच वेळा दिल्लीला गेले आहेत, यातल्या बहुतेकवेळा ते मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी गेले असल्याचं बोललं गेलं.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता एका महिन्यापेक्षा जास्तचा काळ लोटला आहे. तसंच त्यांच्या शपथविधीलाही बरेच दिवस झाले आहेत. 30 जूनला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर प्रत्येकवेळी शिंदे आणि फडणवीस यांच्याकडून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं सांगण्यात येत आहे, पण याला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही.
दरम्यान विरोधकांनीही राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यामुळे टीका केली आहे. विदर्भ-मराठवाड्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं आहे. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे कोणत्याच जिल्ह्याला पालकमंत्री नाही. तसंच सरकारकडून मदत पोहोचत नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तसंच राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशनही अजून झालेलं नाही. सुप्रीम कोर्टामध्ये सरकारच्या भवितव्याबाबतची सुनावणी सुरू असल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.