कोरोनाकाळात घरी बसलेल्या बहुतांश जणांनी अन्नपदार्थ तयार करायला शिकायचा प्रयत्न केला. सध्या तर इतके नवनवीन पदार्थ व त्यांच्या रेसिपीज उपलब्ध झाल्या आहेत, की घरबसल्या कोणालाही ते करणं सहज शक्य होऊ शकतं. जिभेचे चोचले पुरवायला कोणाला नाही आवडत? पण हे करताना तब्येतीवर होणारा आहाराचा परिणाम विसरून चालत नाही. आयुर्वेदही हेच सांगतो. आयुर्वेदात काय खावं, किती खावं, कधी खावं याबाबत नियम सांगितले आहेत. कोणत्या पदार्थांसोबत काय खावं, किंवा खाऊ नये हेही सांगितलं आहे. आहारतज्ज्ञही तेच सांगतात. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने याबाबत माहिती देणाकं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
आयुर्वेदातल्या विरुद्ध आहार या प्रकरणात कशासोबत काय खाऊ नये, हे सांगितलेलं आहे. अशा पदार्थांमुळे पोषणमूल्यांचा ऱ्हास होतो. तसंच गॅसेस, थकवा, मळमळ, पोट फुगणे अशा पचनासंदर्भातल्या तक्रारी निर्माण होतात.
कोबी, फ्लॉवर, लेट्यूस, ब्रोकोली अशा भाज्यांमधलं संयुगं आयोडीन शोषून घ्यायला बाधा आणतात. त्यामुळे थायरॉइड ग्रंथीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे थायरॉइड संदर्भातला काही आजार असल्यास क्रुसिफेरस वर्गातल्या भाज्या अर्थात कोबी-फ्लॉवरसारख्या भाज्यांचं सेवन कमी करावं. तसंच मासे, दुग्धजन्य पदार्थ आणि फोर्टिफाइड सॉल्ट यांच्यासोबत अशा भाज्यांचं सेवन करू नये.
क जीवनसत्त्व आणि दूध
क जीवनसत्त्व असणारी पालकासारखी भाजी आणि संत्रं, लिंबू, प्लम, बेरी वर्गातली फळं यांच्यात आम्ल असतं. दुधामध्ये केसिन नावाचं संयुग असतं. आधीच दूध पचायला जड असतं. त्यात जर ते क जीवनसत्त्व असलेल्या भाज्या किंवा फळांसोबत घेतलं, तर ते घट्ट होण्याची प्रक्रिया होते. यामुळे गॅसेस, छातीत जळजळ अशा तक्रारी सुरू होतात.
चहा आणि लोहयुक्त पदार्थ
अनेकांना चहासोबत पोळी खाण्याची सवय असते; मात्र ती चुकीची असल्याचं आहारतज्ज्ञ सांगतात. चहासोबत लोहयुक्त पदार्थ खाल्ल्यानं चहातलं टॅनिन आणि ऑक्झॅलेट्स शरीरात शोषले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे चहासोबत धान्याचे पदार्थ, पालेभाज्या, नट्स खाऊ नयेत. उपाशीपोटी चहा घेणंही टाळावं.
आहारासोबत फळांचं सेवन
फळं पचायला हलकी व सोपी असतात; मात्र जेवण पचायला वेळ लागतो. या विरुद्ध गुणधर्मांमुळे जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेचच फळं खाऊ नयेत असा सल्ला दिला जातो. त्याचं कारण जेव्हा अन्न पचायला सुरुवात होते, तेव्हा तुम्ही खाल्लेली फळं पोटात तशीच राहतात व त्यामुळे आंबवण्याची क्रिया होते.
नट्स भिजवल्याशिवाय खाऊ नयेत
नट्समध्ये फायटिक आम्ल नावाचं संयुग असतं. या संयुगामुळे नट्समधल्या कॅल्शिअम, आयर्न, झिंक या गोष्टी शरीरात शोषल्या जाऊ शकत नाहीत. बदाम, शेंगदाणे, अक्रोड, सोयाबीन, डाळी भिजवल्यानंतर त्यांच्यातलं आम्ल कमी होतं. त्यामुळे ते घटक अधिक पोषक ठरतात.
विरुद्ध आहार घेतल्यानं पोटाच्या अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे आहार सर्वसमावेशक आणि योग्य असावा, असं आपलं आहारशास्त्र सांगतं.