उद्धव ठाकरे किंवा आदित्य माझे शत्रू नसून आम्ही वैचारिक विरोधक झालोय, कारण ठाकरे यांनी दुसरा विचार पकडलाय. त्यामुळे आम्ही वैचारिक विरोधक आहोत, शत्रू बिलकुल नाही. महाराष्ट्रात एक संस्कृती आहे. राजकारणात वैचारिक विरोध असतो मात्र अलीकडच्या काळात शत्रुत्व बघायला मिळतेय ते योग्य नाही. ते कधीतरी संपवावे लागेल, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील लोणी येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदेचा समारोप गुरुवारी झाला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे उपस्थित होते.पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना फडणवीस म्हणाले की, संजय राऊतांना माझ्या क्षमतेवर विश्वास आहे. याबद्दल त्यांचे आभार मानतो. अलीकडच्या काळात संजय राऊत जे बोलतात ते गांभीर्याने घेण्यासारखे नाही. ते एका पक्षाचे नेते आणि प्रवक्ते आहेत. त्यांनी बोलताना संयम पाळायला हवा. लोकांना खरं वाटेल असं तरी बोलले पाहिजे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. मागच्या सगळय़ा निवडणुकात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रचाराला गेले होते. शरद पवारांपासून सगळे नेते निवडणूक प्रचारात उतरवलेत याचा अर्थ त्यांना काही वेगळे दिसत असेल म्हणून उतरवलेय ना? या पूर्वीच्या कोणत्या पोटनिवडणुकीत पवारसाहेब गेले होते ? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत विरोधीपक्षनेते अजित पवारांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले. प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घ्यायची असते. मते मागायला लाज कशाला वाटायला हवी ? त्यामुळे आम्ही पुणे पोटनिवडणुकीत प्रचारासाठी उतरलोय, असे फडणवीस यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस भावी मुख्यमंत्र्यांचे वेगवेगळे नावे पुढे करीत असते, या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, की राष्ट्रवादीत ही पद्धत आहे. भावी पंतप्रधान भावी मुख्यमंत्री असे ते सांगत असतात. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. माझ्या अनुभवातून मी शिकलोय, कधी काहीही होऊ शकते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असे कोणाला वाटले होते का? ज्याला ज्याला जो भावी वाटतो त्याला शुभेच्छा.
हळूहळू सगळय़ा गोष्टी बाहेर आणेन..
पहाटेच्या शपथविधी बाबत फडणवीस म्हणाले, की हळूहळू गौप्यस्फोट होत आहेत, मी जे बोललो ते कसे खरे होते ते हळूहळू समजत आहे. आतापर्यंत अर्धच समजले आहे, मी काहीही बोललो तर समोरून दुसरी गोष्ट बोलली जाते. त्यामुळे गोष्टी बाहेर येतात. असेच हळूहळू सगळय़ा गोष्टी मी बाहेर आणेन.