सोयाबीनच्या किमती वाढतील अशी अपेक्षा लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोयाबीनच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेलाची किंमत वाढल्याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय. सोयाबीनची निर्यात सध्या वाढल्यानं या किंमतीमध्ये भविष्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. औरंगाबादच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे.
शेतकऱ्यांची प्रतीक्षा फळाला!
मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचे पीक घेतलं शेतकऱ्यांना यंदा पाऊस चांगलं झाल्यामुळे चांगले पीक होईल अशी अपेक्षा होती मात्र अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यानंतर शेतकऱ्यांनी काढलेलं सोयाबीन विक्रीसाठी ठेवलं मात्र समाधानकारक भाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचा घरामध्ये साठा केला होता.
किती मिळणार भाव?
गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या निर्यात वाढली आहे. ही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही समाधानकारक बाब आहे त्यासोबत सोयाबीनच्या तेलाच्या किमतीही वाढल्यात. याचा परिणाम म्हणून सोयाबीनची मागणी वाढू शकते. सोयाबीनला पाच हजार पाचशे रुपयांपर्यंत भाव मिळू शकतो.
अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन घरामध्ये साठवून ठेवली आहे. त्यांनी बाजार भावाची परिस्थिती लक्षात घेऊन टप्प्याटप्यानं सोयाबीनची विक्री करावी. त्याचा त्यांना फायदा होईल, असा सल्ला औरंगाबादचे सोयाबीन व्यापारी जुगलकिशोर दायमा यांनी दिला आहे.