शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. त्यांची महत्त्वाची बैठक पार पडल्यानंतर त्यांचं जेवण होईल. त्यानंतर त्यांचा आजचा मुक्कामही इथेच होणार आहे. हे सर्व आमदार आज ताज हॉटेलमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांचं मोठ्या उत्साहात भाजपकडून स्वागत करण्यात आलं. भाजप नेते गिरीश महाजन, राम कदम या आमदारांच्या स्वागतासाठी नियोजन करण्यात गुंतले होते. त्यांनी आमदारांचे स्वागत केलं. या सर्व धावपळीत या दोन्ही नेत्यांनी ‘न्यूज18 लोकमत’ला प्रतिक्रिया दिली.
“सगळेजण अतिशय खूश आहेत. एक वेगळा आनंद आणि जल्लोष सर्वांमध्ये आहे. विधानसभेत उद्या आमचे 170 पेक्षा जास्त आमदार असतील आणि मोठ्या बहुमताने आमचा अध्यक्ष निवडून येईल”, असा दावा गिरीश महाजन यांनी केला. यावेळी महाजनांना शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्याविषयी वितचारण्यात आलं. त्यावर त्यांनी सगळे ओकेमध्ये आहेत. शहाजी बापूंना आम्ही कडकडून मिठी मारली, अशी प्रतिक्रिया दिली.
शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्याचा व्हीप जारी केला आहे. पण शिंदे गटने या व्हीपला जुमानत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येतोय. याबाबत गिरीश महाजन यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी कायदेशीर बाबींची पूर्वीतयारी केली असल्याचं उत्तर दिलं.
“आम्ही सर्व कायदेशीरपणे तपासून घेतले आहे. शिवसेनेकडे मोजून 15 आमजार राहिलेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बाजूने 41 आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे जास्त संख्या आहे. व्हीप लागू होईल किंवा ना होईल हा दूरचा विषय आहे. पण सर्व कायदेशीर गोष्टींची आम्ही योग्य तपासणी केली आहे”, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.
दरम्यान भाजप आमदार राम कदम यांनी देखील प्रतिक्रिया दिली. “सगळे 50 आमदार आलेले आहेत. आमची सर्व आमदारांची एकत्र बैठक आहे. अध्यक्षपदाची उद्याची निवडणुकीत निश्चितपणे यशस्वीपणे पार पडेल. त्यानंतर विश्वासदर्शक ठरावदेखील यशस्वीपणे पार पडेल. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एकत्रित हिंदुत्ववादी सरकार स्थापन झालं आहे. आमची आता बैठक आहे. बैठकीनंतर सगळ्यांचं जेवण होईल. त्यानंतर या आमदारांचा इथे मुक्काम होईल”, अशी माहिती राम कदम यांनी दिली.