भारतीय क्रिकेट टीम या महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या जाणार आहे. या दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या निवडीसाठी लवकरच निवड समितीची बैठक होणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय टीम 3 टेस्ट आणि 3 वन-डे मॅच खेळणार आहे. निवड समितीच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार असून यामध्ये विराट कोहलीच्या कॅप्टनसीच्या भवितव्यावरही चर्चा होणार आहे.
विराटने टी20 टीमची कॅप्टनसी सोडल्यापासून व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाला दोन कॅप्टन हवेत का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. रोहित शर्मा टी20 टीमचा कॅप्टन आहे. 2023 मध्ये होणाऱ्या वन-डे वर्ल्ड कपचा विचार करून निवड समिती या टीमचाही कॅप्टन रोहितला करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘विराट वन-डे टीमच्या कॅप्टनपदी राहणे अवघड आहे. या वर्षात खूप कमी वन-डे मॅच आहेत. त्यामुळे याबाबतचा निर्णय होण्यास उशीर होऊ शकतो, असा एक तर्क आहे. पण, व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये दोन वेगळे कॅप्टन असल्यास त्यांच्या विचारपद्धतीत फरक असणार आहे. ही जबाबदारी रोहित शर्माला देण्यात यावी असं अनेकांचं मत आहे. त्यामुळे रोहितला 2023 साठी टीम तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकतो.’
टीम इंडियाचे दिग्गज अडचणीत
टेस्ट टीममध्ये अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोन दिग्गजांना आणखी एक संधी मिळेल. पण, रहाणेची व्हाईस कॅप्टन पदावरून हकालपट्टी करण्यात येऊ शकते. या पदासाठी रोहित शर्माचे नाव आघाडीवर आहे. टीम इंडियातील श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल हे युवा बॅटर सध्या फॉर्मात आहेत. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव आणि हनुमा विहारी हे पर्याय देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे रहाणेची प्लेईंग 11 मधील जागा धोक्यात आली आहे. त्याचबरोबर 100 पेक्षा जास्त टेस्ट खेळलेला टीम इंडियाचा अनुभवी फास्ट बॉलर इशांत शर्माची टीममधील जागा धोक्यात आली आहे. त्याच्या भवितव्यावरही निवड समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे.