आज दि.१४ आॕगस्ट च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी, अखेर बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर

राज्य मंत्रिमंडळाचं अखेर खातवाटप जाहीर झालं आहे. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून 40 दिवस उलटल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. त्यानंतर आठवडा उलटल्यानंतरही खातेवाटप जाहीर करण्यात आलं नव्हतं. खातेवाटपाच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून सरकारवर वारंवार ताशेरे ओढले जात होते. अखेर आज मंत्रिमंडळासाठी खातेवाटप जाहीर झालं आहे. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर मोठी जबाबादारी सोपवण्यात आली आहे. त्यांना महसूल विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:

1) राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

2) सुधीर मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

3) चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

4) डॉ. विजयकुमार गावित – आदिवासी विकास

5) गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

6) गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता

7) दादा भुसे- बंदरे व खनिकर्म

8) संजय राठोड – अन्न व औषध प्रशासन

9) सुरेश खाडे – कामगार

10) संदीपान भुमरे – रोजगार हमी योजना व फलोत्पादन

11) उदय सामंत – उद्योग

12) प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

13) रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

14) अब्दुल सत्तार – कृषी

15) दीपक केसरकर – शालेय शिक्षण व मराठी भाषा

16) अतुल सावे – सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

17) शंभूराज देसाई – राज्य उत्पादन शुल्क

18) मंगलप्रभात लोढा – पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

विनायक मेटेंच्या पार्थिवावर उद्या बीडमध्ये अंत्यसंस्कार

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी मेटेंच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले. दरम्यान, मेटे यांच्या पार्थिवावर सोमवारी (१५ ऑगस्ट) बीड जिल्ह्यातील उत्तमनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तशी माहिती शिवसंग्रामच्या स्थानिक नेत्यांनी दिली आहे. आज (१४ ऑगस्ट) संध्याकाळपर्यंत विमानाने विनायकराव मेटे यांचे पार्थीव बीड येथे त्यांच्या घरी आणण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत मेटे यांचे पार्थीव अंत्यदर्शनासाठी शिवसंग्राम भवन या ठिकाणी ठेवण्यात येईल. नंतर दुपारी साडे तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. या अंत्यविधीसाठी महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते येणार आहेत, अशी माहिती शिवसंग्रमाच्या कार्यकर्त्यांनी दिली.

राज्यासाठी पुढचे दोन दिवस महत्त्वाचे, पुण्यात होणार मुसळधार पाऊस 

हवामान खात्याने 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पाऊस परिस्थिती संदर्भात इशारा दिला आहे. राज्यातील पुणे, सातारा घाट माथ्यावर काही भागात मुसळधार पाऊस होणार आहे. तसेच कोकणातही जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर पुणे शहरात परिसरात सकाळच्या सत्रात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान खात्याने के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस होत आहे. आता हवामान खात्याने पावसासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. राज्यात पुढचे दोन दिवसा पावसाची शक्यता आहे अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

हॅरी पॉटर फेम जे. के. रोलिंग यांना जीवे मारण्याची धमकी

प्रसिद्ध लेखक सलमान रुश्दी यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. हल्ला करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र आता त्यानंतर हॅरी पॉटर फेम लेखिका जे.के. रोलिंग यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रश्दी यांच्यावरील हल्ल्यानंतर रोलिंग यांनी शुक्रवारी ट्विटरवर लिहिले, ‘भयानक बातमी आहे.

मला अस्वस्थ वाटत आहे. खूप आजारी असल्यासारखं वाटत आहे. त्यानंतर त्यांना मीर आसिफ अजीज नावाच्या ट्वीटर अकाऊंटवरून धमकी देण्यात आली. ‘काळजी करू नका, पुढचा नंबर तुमचा आहे अजीजने म्हटलं आहे.

भारतात मोठा घातपात घडवण्याचा कट, उत्तर प्रदेशातून दोन दहशतवाद्यांना बेड्या

आपण कधी कल्पनाही करु शकत नाही इतके भयानक कट काही विकृत मनाचे नराधम आखत असतात. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत असताना उत्साहाचं वातावरण असताना एक धक्कादायक बातमी समोर आली. उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाने एक मोठी कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशच्या एटीएसने राज्यातून दोन वेगवेगळ्या भागातून दोन तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. हे दोन्ही आरोपी हे जैश-ए-मोहम्मद आणि तहरीक-ए-तालिबान या खतरनाक दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होते. त्यांचा भारतात मोठा घातपात घडवण्याचा डाव होता. पण त्यांचा डाव पूर्ण होण्याआधी पोलिसांनी त्यांना जेरबंद केलं.

गुलाबराव पाटलांनी अभिवादन केलं, शिवसैनिकांकडून शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक

शिवसेनेमध्ये बंडखोरी केल्यानंतर आता शिंदे सरकार स्थापन झाले आहे. अलीकडे शिंदे सरकारचा विस्तार सुद्धा झाला आहे. पण, शिवसैनिकांमध्ये अजूनही तीव्र संताप कायम आहे. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं होतं. त्यानंतर शिवसैनिकांनी पुतळ्याला दुग्धाभिषेक केला.मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील हे शनिवारी प्रथमच जळगावात आले होते. यावेळी आपल्या मतदारसंघातील धरणगाव येथे गुलाबराव पाटील यांनी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन केलं.

 ‘जंगलात 4 हजार वाघ पण राहुल द्रविड एकच!’ पाहा रॉस टेलरच्या आत्मचरित्रातला भन्नाट किस्सा

न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज रॉस टेलरनं काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. निवृत्तीनंतर टेलरनं आपलं एक आत्मचरित्र नुकतच प्रकाशित केलं. ‘रॉस टेलर- ब्लॅक अँड व्हाईट’ या आपल्या आत्मचरित्रात टेलरनं आपल्या क्रिकेट कारकीर्दीतील अनेक घटनांना उजाळा दिला आहे. आणि त्यातलाच एक किस्सा आहे तो टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक ‘द वॉल’ राहुल द्रविडबाबतचा.रॉस टेलर एकदा राहुल द्रविडसोबत राजस्थानमधलं रणथंबोर नॅशनल पार्क पाहायला गेला होता. त्यावेळी इतर पर्यटकांचीही तिथे भरपूर गर्दी होती. तिथे हे सगळे पर्यटक वाघ बघायला आले होते. पण द्रविड दिसताच  सगळ्यांचं लक्ष वाघांऐवजी द्रविडकडेच वळलं. टेलर आणि द्रविडनं त्यावेळी अवघ्या 100 मीटरवरुन वाघ पाहिला. पण इतर पर्यटकांचे कॅमेरे वाघाबरोबर द्रविडकडेही वळले होते. तेव्हा टेलरनं मिश्किलपणे टिप्पणी केली आणि आपल्या पुस्तकात म्हटलंय, “ जगभरात जवळपास 4 हजार वाघ आहेत. पण द्रविड एकच आहे. म्हणूनच वाघासोबतच द्रविडला पाहण्यासाठीही पर्यटक तितकेच उत्सुक होते.”

खातेवाटपानंतर एकनाथ शिंदेंचे 5 मंत्री नाराज, एकाचा फोन स्विच ऑफ

एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर अखेर खातेवाटपाचा निर्णयही झाला आहे, पण या खातेवाटपामुळे शिंदे गटातले 5 मंत्री नाराज झाले आहेत. दादा भुसे, गुलाबराव पाटील, दिपक केसरकर, संजय राठोड आणि संदिपान भुमरे हे पाच मंत्री त्यांना मिळालेल्या खात्यावर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे दादा भुसे यांचा फोन स्विच ऑफ येत आहे.

SD social media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.