नाशिकमध्ये एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. दुसरीकडे ओमिक्रॉन विषाणूचे बहुतांश रुग्ण असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागत नाहीय. मात्र, गंभीर रुग्णांचे मृत्यू होत असल्याने पुन्हा एकदा शंकेची पाल चुकचुकलीय. नाशिक जिल्ह्यात 11 फेब्रुवारी रोजी कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यात नाशिक महापालिका हद्दीतील 3 आणि नाशिक ग्रामीणमधील 2 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 63 हजार 252 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 1 हजार 980 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 488 ने घट झाली आहे. आत्तापर्यंत 8 हजार 865 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 167, बागलाण 112, चांदवड 80, देवळा 78, दिंडोरी 138, इगतपुरी 50, कळवण 89, मालेगाव 55, नांदगाव 66, निफाड 232, पेठ 41, सिन्नर 151, सुरगाणा 99, त्र्यंबकेश्वर 62, येवला 118 असे एकूण 1 हजार 538 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 349, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 23 तर जिल्ह्याबाहेरील 70 रुग्ण असून, असे एकूण 1 हजार 980 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 74 हजार 97 रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, कोरोनाचे मृत्यू पाहता नागरिकांनी नियमांचे पालन करावे. मास्क वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना बाधितांचे मृत्यू पाहता प्रशासनाने नाशिक जिल्हा रुग्णालय आणि मालेगाव उपजिल्हा रुग्णालयांमध्ये माड्युलर आयसीयू बेड खरेदीला मंजुरी दिलीय. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेची संयुक्त आढावा बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
कोविड कामासाठी जिल्ह्याला 49 कोटींचा निधी मिळणार आहे. त्यातील 23 कोटी रुपये आले आहेत. त्या पैशातून जिल्हा रुग्णालयात 30 आणि मालेगावच्या उपजिल्हा रुग्णालयात असे 10 अत्याधुनिक बेडची खरेदी केली जाणार आहे. तर उर्वरित 26 कोटींचा निधीही मिळाला आहे. या खर्चाचे येत्या मार्चपर्यंत नियोजन करण्यात येणार आहे.