तर मोठी किंमत वसूल करू, लष्कर प्रमुख
नरवणे यांचा पाकिस्तानला इशारा
एकीकडे देशात करोनाच्या संकटाशी सामना सुरू असताना दुसरीकडे सीमाभागात पाकिस्तानकडून कागाळ्या सुरूच असल्याचं दिसून येत आहे. सीमाभागात दहशतवाद्यांकडून वारंवार घुसखोरीचा प्रयत्न केला जात आहे. हे प्रयत्न भारतीय जवानांकडून हाणून पाडले जात असले, तरी यातून पाकिस्तानचा छुपा अजेंडाच वारंवार सिद्ध होताना दिसत आहे. या सर्व मुद्द्यांवर भारताचे लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावरून नरवणे यांनी पाकिस्तानला सज्जड दम दिला असून कारवाईसाठी भाग पाडल्यास मोठी किंमत वसूल करू, असं देखील नरवणे यांनी म्हटलं आहे.
यवतमाळ मध्ये कापसाला
ऐतिहासिक सर्वाधिक दर
यवतमाळ जिल्ह्यातील चार ठिकाणी कापसाच्या दराने दहा हजाराचा टप्पा ओलांडला. फुलसावंगी बाजारपेठेत कापसाला सर्वाधिक १० हजार ४०० रुपयांचा विक्रमी दर मिळाला. यवतमाळ, राळेगाव आणि वणी बाजारपेठेतही कापसाचा दर दहा हजारांच्या ४४० रुपये क्विंटलहून अधिक झालाय. जिल्ह्याच्या ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कापसाला दहा हजारांहून अधिकचा दर मिळाला. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी सुखावला आहे. मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाल्यामुळे मागील आठ दिवसांपासून कापसाचे दर सारखे वाढत होते.
शेअर बाजारातही मोठी तेजी,
500 अंकांनी वधारला
जागतिक बाजारातील तेजीच्या संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारातही मोठी तेजी दिसून आली. भारतीय बाजारांच्या आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक हिरव्या निशाणासह बंद झाले. सेन्सेक्स जवळपास 500 अंकांनी वधारला आहे, तर निफ्टीने 18200 चा टप्पा पार केला आहे. हेवीवेट स्टॉकमध्ये जोरदार ऍक्शन दिसून आली. सेन्सेक्स 30 मधील 18 शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. निफ्टीवर ऑटो इंडेक्स 1.5 टक्के आणि मेटल इंडेक्स सुमारे 1.5 टक्क्यांनी वधारला. त्याचवेळी बँक आणि वित्तीय शेअर्समध्येही तेजी दिसून आली.
लता मंगेशकर यांची
प्रकृती पूर्वपदावर
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथून त्यांची प्रकृती पूर्वपदावर आली आहे. याविषयी चाहत्यांमध्ये सतत चिंतेचे वातावरण आहे. आमच्या दीदींची प्रकृती कशी आहे याबाबत चाहते चिंतेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 92 वर्षीय लता मंगेशकर यांना वयामुळे इतरही अनेक समस्या आहेत, त्यामुळे डॉक्टर त्यांची विशेष काळजी घेत आहेत. वृत्तानुसार, 92 वर्षीय लताजींना शनिवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रत्नागिरीत ४०० वर्षांहून जुना
आफ्रिकन बाओबाब वृक्ष आढळला
रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास ४०० वर्षांहून अधिक जुना महाकाय आफ्रिकन बाओबाब वृक्ष आढळला आहे. या वृक्षाला भारतामध्ये गोरख चिंचेचे झाड म्हणून ओळखले जाते. हे वृक्ष आढळल्यानंतर रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी त्याचे महत्त्व ओळखून तात्काळ त्याचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटनदृष्ट्या ‘हेरिटेज ट्री’चा वापर करून तेथे उत्तम पर्यटन स्थळ निर्माण करण्याचा मानस जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच खासगी कंपनीच्या सीआरपीएस फंडातून हेरिटेज ट्री म्हणून पर्यटन सेल्फी पॉइंट विकसित करण्यात येईल. या झाडाचे महत्व काय, झाड किती वर्षांपूर्वीचे आहे ही माहिती देखील तिथे लावली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
बीडच्या पोलीस दलातील
प्रतिभा सांगळे ठरल्या मिस महाराष्ट्र
बीडच्या पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या प्रतिभा सांगळे या मिस महाराष्ट्र ही स्पर्धा जिंकल्यानंतर सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. पोलीस दलात कार्यरत असतानाच त्यांनी मिस महाराष्ट्र हा किताब पटकावलाय. प्रतिभा सांगळे या मूळच्या आष्टी तालुक्यातील असून त्या २०१० सालापासून बीडच्या पोलीस दलात कार्यरत आहेत. सध्या त्या पोलीस मुख्यालयात महिला कॉन्स्टेबल म्हणून कर्तव्य बजावत आहेत.
भाजपाच्या मुख्यालयातल्या
५० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण
भारतीय जनता पार्टीच्या दिल्ली मुख्यालयातल्या ५० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये सफाई कर्मचारी, सुरक्षा कर्मचाऱी यांच्यासह माध्यम विभागात करणाऱ्या संजय मयुख यांना करोना संसर्ग झाला आहे. हे सर्वजण सध्या विलगीकरणात असून सर्व करोना नियमांचं पालन करत असल्याची माहिती हाती आली आहे.
भारताचा पहिला डाव २२३ धावांवर
संपुष्टात, आफ्रिका ८ षटकात १ बाद १७ धावा
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊनमध्ये तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळवला जात आहे. आज या सामन्याचा दुसरा दिवस. आफ्रिका संघाने ८ षटकात १ बाद १७ धावांरून पुढे खेळायला सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा कप्तान डीन एल्गरला काल लवकर तंबूत धाडण्यात भारताला यश आले. तत्पूर्वी विराट कोहलीने भारतीय संघात पुनरागमन करत नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकेच्या वेगवान आणि तिखट माऱ्यासमोर विराट वगळता भारताचे फलंदाज ढेपाळले आणि त्यांचा पहिला डाव २२३ धावांवर संपुष्टात आला. विराटने ७९ धावा करत संघाला आधार दिला.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा ऑक्सीजन
प्लांट नाशिकला उभारणार
नाशिक महापालिकेने महाराष्ट्रातील सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट उभारला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. खरे तर महापालिकेकडे केवळ 13 मेट्रीक टन ऑक्सिजनची क्षमता होती. मात्र, आता पालिकेने तब्बल 3 कोटी रुपये खर्चून 140 मेट्रीक टन क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट उभारल्याची माहिती त्यांनी दिली. सबंध उत्तर महाराष्ट्राची चिंता मिटल्याचा दावाही यावेळी केला.
राजनाथ सिंह, नड्डा यांच्यानंतर
आता नितीन गडकरींना कोरोना
मागील अनेक दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेची झोप उडाली असून कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. राज्यातील अनेक मंत्री, आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाले आहे. याबाबतची माहिती खुद्द नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे. तसेच त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. सध्या गडकरी यांची प्रकृती उत्तम असून त्यांना सौम्य लक्षणे आहेत. तसेच सध्य ते गृहविलगीकरणात आहेत. त्याच्यावर उपचार सुरु आहे.
(छायाचित्र – गुगल )
SD social media
9850 60 35 90