आज दि.४ एप्रिल च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

महाविकास आघाडीत हालचालींना वेग, राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता – सूत्रांची माहिती

राज्यातील ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या महिन्यातच मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांची एक बैठक होणार असून या बैठकीनंतर मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये गृहखात्याची अदला-बदल होण्याची चर्चा होण्याची शक्यता आहे. साधारणत: 8 एप्रिल रोजी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत.

पुढील चार दिवसात महाराष्ट्रात जोरदार वारे, पावसाची शक्यता

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा लोकांना बसत आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्रातील तापमानात वाढ होत आहे. मे महिना आला नाही तरीही मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आणि एप्रिलच्या सुरुवातीला महाराष्ट्रात तापामानाने उच्चांक गाठल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, असे असले तरीही पुढील 4-5 दिवसांत महाराष्ट्रात काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.याबाबतची माहिती आयएमडीचे अधिकारी केएस होसाळीकर यांनी दिली.राज्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमान काल 40 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवलं गेलं. यातील सर्वात जास्त तापमान हे अकोला (44.0) व नंतर मालेगाव, चंद्रपूर (43.0) येथे नोंदवलं गेलं.

पाकिस्तानची एक बोट भारतीय
समुद्री हद्दीमध्ये घुसल्याचे उघड

पाकिस्तानची एक बोट भारतीय समुद्री हद्दीमध्ये घुसल्याचं समोर आलं आहे. ही बाब सीमा सुरक्षा दलाच्या निदर्शनास आली असून त्यावर कारवाई करण्यात आली आहे. गुजरातमधल्या भुजमधील हरामी नाला भागातून एका पाकिस्तानी बोटीला ताब्यात घेण्यात आलं. समुद्री सीमेवर स्तंभ क्रमांक ११६० जवळ भारतीय सीमेत जवळपास १०० मीटर आतमध्ये ही नाव पकडण्यात आली असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाने दिली आहे. ३ एप्रिल रोजी गुजरातमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या बोटीवर कारवाई केली. मासेमारी करणारी ही बोट असून या बोटीमध्ये मासे साठवण्याचं सामानही आढळून आलं आहे. एएनआयनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाचा
कहर, लॉकडाउन लावण्याची वेळ

चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाने कहर केला असून लॉकडाउन लावण्याची वेळ ओढावली आहे. दरम्यान एकीकडे अनेक देश करोनाच्या विळख्यातून बाहेर पडत असताना चीनने मात्र जगाची चिंता वाढवली आहे. याचं कारण म्हणजे चीनमध्ये करोनाचा नवा उपप्रकार आढळला आहे. हा उपप्रकार ओमायक्रॉन व्हेरियंटचा आहे. चीनमध्ये एका दिवसात १३ हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.

सेल्फीचा मोह जीवावर बेतला, नवदाम्पत्यासह मित्राचा पाण्यात बुडून मृत्यू, बीडमधील घटना

सेल्फी काढण्याचा मोह नव्याने लग्न झालेल्या दाम्पत्याच्या जीवावर बेतल्याची घटना बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात घडली आहे. बंधाऱ्याजवळ सेल्फी काढत असताना अचानक तोल गेला आणि तिघा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव इथंही दुर्दैवी घटना घडली. ताहा शेख ( वय 20 ), सिद्दीकी शेख (22, ), शहाब (वय 25) अशी मृत झालेल्या तिघांची नाव आहे. हे तिघेही अंबड येथील राहणारे होते.

परभणी मध्ये 121 पेट्रोल तर
श्रीगंगानगरमध्ये 120 रुपये डिझेल

पेट्रोल आणि डिझेलच्या दर रोज वाढत आहेत. गेल्या दोन आठवड्यात १२ वेळा दरवाढ झाली आहे. दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत एकूण दर ८ रुपये प्रति लिटरने वाढले. उपलब्ध किंमत यादीनुसार, महाराष्ट्रातील परभणीमध्ये सामान्य पेट्रोलची किंमत १२१.३८ रुपये तर, डिझेलची किंमत १०३. ९७ रुपये आहे. दरम्यान, राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्येही इंधनाच्या दरांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. तिकडे पेट्रोल १२०.७३ रुपये आणि डिझेल १०३.३० रुपये दराने विकले जात आहे.

ईडीने बोलावल्या बरोबरच इंजिनचा
ट्रॅक बदलला : छगन भुजबळ

राजसाहेबांचं काही कळतच नाही. एवढं एकदम भाजपाविरोधात बोलता बोलता ईडीने त्यांना फक्त बोलवलं. तेव्हापासून इंजिन वेगळ्याच ट्रॅकवर गेलं. कोहिनूर टॉवर एकदम हलायलाच लागला त्यांचा. काय कळतं नाही हे,” असा खोचक टोला भुजबळांनी लगावला. “त्यांना काय सांगायचंय ते स्पष्ट सांगावं. भाजपाची बी टीम म्हणून काम करायचं तर तसंही त्यांनी जाहीर करावं की आम्ही तसे प्रयत्न करतोय. पण असं आडवळणाने बोलत बोलत जाऊन टीका टिप्पणी करण्यात काय अर्थ आहे,” असंही छगन भुजबळ म्हणालेत.

शरद पवार यांनी किती वेळा
रंग बदललेत : केशव उपाध्याय

केशव उपाध्ये यांनी रंग बदलणारा सरडा वैगेरे ठीक आहे पण शरद पवार याचं काय? पवारांनी राजकीय किरकिर्दीत कितीवेळा रंग बदललेत? अशी विचारणा केली आहे. त्यांनी ट्विट करत पवारांच्या राजकीय जीवनातील प्रवासातील काही घडामोडींचा उल्लेख केला आहे. “रंग बदलणारा सरडा वैगेरे ठीक आहे. पण शरद पवार यांच काय? १९७८ मध्ये वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोदचं सरकार स्थापन करत राज्याचे मुख्यमंत्री बनले. समाजवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. १९८६ मध्ये समाजवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली. पुन्हा १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्दयावरून काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादीची स्थापना केली. पुन्हा सत्तेसाठी काँग्रेसच्या जवळ गेले. सरकारमध्ये मंत्रिपदे घेतली,” असं केशव उपाध्ये म्हणाले आहेत.

रशियन सैनिकांनी अगदी १० वर्षांच्या
मुलींवरही अत्याचार केल्याचा आरोप

रशियन सैनिकांनी अगदी १० वर्षांच्या मुलींवरही बलात्कार केले तसंच महिलांच्या शरीरावर डाग लावल्याचा आरोप युक्रेनच्या खासदार लेसिया बॅसिलेन्क यांनी ट्विटरवरून केला आहे. या सैनिकांनी महिला आणि मुलींच्या शरीराची अक्षरशः चिरफाड केली असून क्रूर अत्याचार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महिलांच्या शरीरावर लोखंडी सळया तापवून डाग देण्यात आले आहेत. हे डाग स्वस्तिक या भारतीय प्रतिकासारख्या दिसणाऱ्या चिन्हाप्रमाणे असल्याचंही लेसिया यांनी म्हटलं आहे.

१० राज्यांमध्ये ड्रोन पायलटच्या
प्रशिक्षणासाठी १८ शाळा उघडणार

ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार नवनवीन योजना आणत आहे. अनेक क्षेत्रात ड्रोनच्या वापरालाही मान्यता देण्यात आली आहे. २०२२ चा अर्थसंकल्प सादर करताना केंद्र सरकारने ड्रोनशी संबंधित एक मोठी घोषणा केली. मोबाईल आणि कॉम्प्युटर सारखाच दैनंदिन जीवनात ड्रोनचाही समावेश करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात ड्रोन पायलटचीही गरज भासणार आहे. भविष्यातील ड्रोन पायलटची गरज लक्षात घेता १० राज्यांमध्ये ड्रोन पायलटच्या प्रशिक्षणासाठी १८ शाळा उघडण्यात आल्या आहेत.

केदारनाथ धामचे दरवाजे
६ मे पासून उघडणार

६ मे पासून केदारनाथ धामचे दरवाजे उघडणार आहेत. यासाठी प्रवाशांना केदारनाथ धामला पूर्ण सहजतेने पोहोचता यावे यासाठी सरकारने हेलिकॉप्टरचे बुकिंगही सुरू केले आहे. गुप्तकाशी, सिरसी आणि फाटा येथून केदारनाथ धामपर्यंत तुम्ही हेलिकॉप्टर सेवा बुक करू शकता. केदारनाथ धामपर्यंत जाण्यासाठी तुम्ही घरबसल्या ऑनलाईन बुक करू शकता. यासाठी उत्तराखंड सरकारच्या heliservices.uk.gov.in या वेबसाइटला भेट देऊन बुकिंग करावे लागेल. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन उत्तराखंड सरकारने यंदाही हेलिकॉप्टर सेवेच्या भाड्यात वाढ केलेली नाही.

तो लवकरच टीम इंडियातून तिन्ही फॉरमॅट खेळेल, बटलरची भविष्यवाणी

राजस्थान रॉयल्सचा अनुभवी खेळाडू जॉस बटलरने भारतीय खेळाडूबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. प्रसिद्ध कृष्णाकडे यशस्वी फास्ट बॉलर होण्याचे सगळे गूण आहेत, तसंच तो लवकरच टीम इंडियातून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळताना दिसेल, असं बटलर म्हणाला आहे. मागच्या वर्षी मार्च महिन्यात वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कृष्णाने एका वर्षात त्याच्या कामगिरीने अनेकांना प्रभावित केलं आहे. वेग आणि बाऊन्समुळे त्याने वेस्ट इंडिजच्या बॅटरनाही त्रास दिला. आयपीएलच्या मागच्या मोसमात त्याने केकेआरकडून खेळताना उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.