“भारतात दहशतवादी कारवाया करून कोणी पाकिस्तानात पळून गेला तर आम्ही त्याला पाकिस्तानात घुसून मारू”, असे विधान देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केले होते. त्यानंतर आता पाकिस्तानने त्यावर प्रतिक्रिया दिली असून या विधानाचा निषेध केला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र खात्याचे मंत्री म्हणाले की, राजनाथ सिंह यांचे विधान चिथावणीखोर असून दीर्घकालीन संबंधाच्या प्रयत्नांमध्ये अडथळा आणणारे आहे.
पाकिस्तानने शांतता प्रस्थापित करण्यासाठी नेहमी प्रयत्न केले आणि आपली वचनबद्धता दाखविली. पाकिस्तान स्वतःच्या सुरक्षेसाठी सक्षम असून इतिहासात आम्ही वेळोवेळी हे दाखवून दिलेले आहे.
गार्डियन या दैनिकाने पाकिस्तानात गेल्या काही काळात झालेल्या कारवायांचा हवाला देऊन भारताने २० पेक्षा अधिक लोकांना पाकिस्तानी भूमीवर लक्ष्य केल्याचे म्हटले. याचाच धागा पकडून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना सीएनएन-न्यूज १८ च्या मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, “कोणीही आमच्या देशाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना जशास तसं प्रत्युत्तर देऊ. कोणी भारतात दहशतवादी कारवाया केल्या आणि पळून पाकिस्तानला गेला तर आम्ही त्याला पाकिस्तानमध्ये घुसून मारू.”