राज ठाकरेंच्या सभेची उत्सुकता शिगेला! ‘ट्रेलर, टिझर नाही थेट सिनेमा!’
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्क मैदानावरून महाराष्ट्राला संबोधित करणार आहेत. महाराष्ट्रात मागच्या दोन ते अडीच वर्षात झालेल्या घडामोडी, राज ठाकरेंचं मशिदींवरच्या भोंग्यांविरूद्धचं आंदोलन. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा वैचारिक वारसा, महाविकास आघाडी सरकार या आणि अशा सगळ्या मुद्द्यांचा चौफेर समाचार राज ठाकरे घेणार आहेत.शिंदे फडणवीस सरकार ज्या प्रकारे आलं त्यावरही ते बोलतील अशी अपेक्षा आहे. मराठी भाषा दिनाच्या दिवशी राज ठाकरे यांची सविस्तर मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीच्या वेळी त्यांना तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी नेमकं काय बोलणार? हे विचारलं असता ट्रेलर, टिझर नाही थेट चित्रपटच दाखवणार असं राज ठाकरे म्हणाले होते. आता राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राज ठाकरेंच्या गुढी पाडवा मेळाव्याशी संबंधित प्रत्येक घडामोड आपण या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
पुण्यात ओशोंच्या अनुयायांचा धुडगूस, आश्रमाचा गेट तोडून अनुयायी आत घुसले, पोलिसांचा लाठीचार्ज
जगप्रसिद्ध भारतीय तत्त्वज्ञ ओशो यांच्या पुण्यातील आश्रमात त्यांच्या अनुयायांनी धुडगूस घातला आहे. आश्रम व्यवस्थापनाचा दबाव झुगारून अनुयायी आश्रमात घुसले. आश्रम व्यवस्थापनाने अनुयायांना संन्यासी माळा घालून आश्रमात येण्यास बंदी घातल्याने अनुयायी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जदेखील केला.पुण्यातील ओशोंच्या आश्रमात अनुयायांना संन्यासी माळा घालून प्रवेश देण्यास आश्रम व्यवस्थापनाने मनाई केल्यानंतर शेकडो अनुयायी या माळा घालून जबरदस्तीने आश्रमात घुसले असल्याची माहिती टीव्ही ९ मराठीने दिली आहे. जगभरात २१ मार्च हा दिवस ओशोंचे अनुयायी ‘संबोधी दिन’ म्हणून साजरा करतात. काल (मंगळवार, २१ मार्च) जगभरातले ओशोंचे अनुयायी ओशोंच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आश्रमात आले होते. यापैकी बऱ्याच अनुयायांच्या गळ्यात सन्यासी माळा होत्या.
अयोध्या राम मंदिरासाठी चंद्रपुरातील १८०० क्यूबिक मीटर सागवान लाकूड पाठवणार
अयोध्या येथील राम मंदिरासाठी १८०० क्यूबिक मीटर सागवान लाकूड चंद्रपूर जिल्ह्यातून पाठविण्यात येणार आहे. २९ मार्च रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत उत्तर प्रदेश सरकार मधील तीन कॅबिनेट मंत्री तथा अयोध्या राम मंदिरातील पुजारी सहभागी होणार असल्याची माहिती भाजप नेते तथा राज्याचे सांस्कृतिक व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.भारतीय जनता पार्टी महानगर व ग्रामीणच्या वतीने गुढीपाडव्याचे औचित्य साधून बुधवार २२ मार्च रोजी सकाळी गांधी चौक येथे गुढीपूजन व १ कोटी रामनाम जाप लिखाण पुस्तिकेचे वितरणाची सुरुवात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. रामनाम जापाच्या या पुस्तिका अयोध्या येथील नवनिर्मित राम मंदिरासाठी लोकनेते मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बल्लारपूर येथून पाठविण्यात येणाऱ्या काष्ठ(सागवान)पूजन प्रसंगी २९ मार्चला प्रभू श्री रामाला समर्पित केल्या जातील.
अमृतपाल सिंगचे सात लुक; पंजाब पोलीसही चक्रावले, पुन्हा रुप बदलल्याचा व्यक्त केला संशय!
गेल्या काही दिवसांपासून देश पातळीवर अमृतपाल सिंग हे नाव चर्चेत आलं आहे. ‘वारिस पंजाब दे’ या खलिस्तान समर्थक संघटनेचा म्होरक्या असणारा अमृतपाल सिंग सध्या फरार आहे. पंजाब पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. “८० हजारांचा पोलीस फौजफाटा असूनही अमृतपाल सिंग तुमच्या हातून निसटलाच कसा?” असा जाबही पतियाला उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला विचारला आहे. त्यामुळे एकूणच अमृतपाल सिंग हे नाव सध्या पोलीस यंत्रणेपासून गुप्तहेर खात्यापर्यंत सगळ्यांच्याच हिटलिस्टवर आहे. मात्र, एवढं असूनही अमृतपाल सिंग सापडत नसल्याचं एक कारण त्याच्या पेहेरावात दडल्याचं सांगितलं जातंय.पोलिसांना चकवा देण्यासाठी अमृतपाल सिंग वेगवेगळे वेश धारण करत असल्याची माहिती पंजाब पोलिसांकडून देण्यात आली आहे. यासंदर्भातला एक व्हिडीओही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये अमृतपाल सिंगनं काही वेळातच वेगळा वेश धारण करून पोबारा केल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे पंजाब पोलिसांसाठी सध्यातरी अमृतपाल सिंग एक कोडं बनून राहिला आहे. अर्थात, त्याच्या नातेवाईकांकडून अमृतपालला पोलिसांनी आधीच अटक केली आहे, असा दावा केला जात असला, तरी पोलिसांकडून अद्याप त्याचा शोध चालू असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
नोबेल विजेते अमर्त्य सेन यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप का ?
नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांना १३ डिसमिल जमिनीचा ताबा सोडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. विश्वभारती विद्यापीठाने तीन दिवसात अमर्त्य सेन यांना ही दुसरी नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत अमर्त्य सेन यांनी जमिनीवरचा ताबा त्वरित सोडावा असं म्हटलं आहे. विश्वभारती विद्यापीठाचा हा आरोप आहे की अमर्त्य सेन यांच्याकडे त्यांच्या वाट्यापेक्षा जास्त जमीन आहे त्यामुळे आता ही जमीन अमर्त्य सेन यांनी विश्वभारती विद्यापीठाला परत करावी.
गुढीपाडव्याला संभाजीराजेंचा मोठा निर्धार, शिंदे गटाच्या मंत्र्यांचीही करणार पोलखोल
आज गुढीपाडवा आहे. हिंदू धर्मातील वर्षाचा पहिला दिवस आहे. राज्यभरात मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा होत आहे. गुढी उभारून नववर्षाचं मोठ्या धुमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक संकल्प केले जातात. असाच एक संकल्प संभाजीराजे छत्रपती यांनी देखील केला आहे. स्वराज्य संघटना 2024 मध्ये राजकारणाची विजयी गुढी उभा करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.स्वराज्य संघटना 2024 मध्ये राजकारणाची विजयी गुढी उभा करेल असा विश्वास संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला आहे. या सोबतच धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात जाऊन ज्या पद्धतीने पोलखोल केली त्याच पद्धतीने इतर मतदारसंघांमध्ये सुद्धा लवकरच पोलखोल करणार असल्याचा इशाराही यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.
भारतात पाय पसरतोय करोनाचा XBB1.16 व्हेरिएंट, डॉक्टरांनी दिला ‘हा’ इशारा
भारतात गेल्या काही दिवसांपासून करोना (Covid 19) रूग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. तसंच सक्रिय रूग्णांची संख्याही वाढते आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांमध्ये जे करोना रूग्ण वाढू लागले आहेत त्याचं कारण XBB1.16 हा नवा व्हेरिएंट आहे. XBB1.16 हा व्हेरिएंट ओमिक्रॉन व्हेरिएंटचं रिकॉम्बिनेशन असलेल्या XBB सारखाच आहे. हा व्हेरिएंट भारतात पाय पसरू लागला आहे. सध्या भारतात XBBB1.16 चे ७६ रूग्ण आहेत.
क्रिकेट रसिकांसाठी खुशखबर! वनडे वर्ल्ड कपच्या तारखा ठरल्या
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेचा शेवटचा सामना होण्यापूर्वीच आता क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपच्या तारखा ठरल्या असून ईएसपीएन क्रिकइन्फोने याबाबत अहवाल जाहीर केला आहे. यात वनडे वर्ल्ड कपच्या सुरुवातीपासून ते अंतिम सामन्यापर्यंतच्या अनेक गोष्टींविषयी माहिती देण्यात आली आहे.
भारताच्या धर्तीवर यंदा खेळवण्यात येणाऱ्या वनडे वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या दरम्यान वनडे वर्ल्ड कपमध्ये तब्बल 48 सामने खेळवले जाणार असून यात तीन बाद फेऱ्या पारपडतील. भारतातील 12 शहरांमध्ये हे सामने खेळवले जाणार असून यात मुंबई सह हैदराबाद, कोलकाता, लखनौ, इंदूर, दिल्ली, लखनौ, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, गुवाहाटी, राजकोट या शहरांचा समावेश आहे. तसेच वनडे वर्ल्ड कपचा शेवटचा सामना हा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येईल.
अफगाणिस्तान-पाकिस्तानसह उत्तर भारतात भूकंपाचा धक्का; नऊ जणांचा मृत्यू, १०० पेक्षा जास्त जखमी
गेल्या काही दिवसांपासून जगभरात भूकंपाचे धक्के बसत आहेत. टर्की, चीन, नेपाळ, ताजिकिस्ताननंतर आता अफागाणिस्तान आणि पाकिस्तानमध्येही भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता ६.६ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली असून या घटनेत पाकिस्तानातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे अफगाणिस्तानमध्येह काही दिवसांपूर्वीच भूकंपाचा धक्का बसला होता.राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, रात्री १०.३० च्या सुमारास अफगाणिस्तानच्या हिंदूकुश क्षेत्रात ६.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूंकपाचे झटके पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वासह उत्तर भारतातही जाणवले. या भूंकपाचे केंद्र अफगाणिस्तानच्या जुर्म भागात होते.
गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढं कांगारुंची चौफेर फटकेबाजी; भारताला २७० धावांचं आव्हान
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामना चेन्नईत सुरु आहे. या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी १ सामना जिंकला आहे. त्यामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी झाल्याने चेपॉक स्टेडियमवर आज अंतिम सामन्याचा थरार रंगला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने ४९ षटकांत सर्वबाद २६९ धावा केल्या असून टीम इंडियाला विजयासाठी २७० धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फलंदाज ट्रेविस हेड आणि मिचेल मार्शने पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात केली. दोघांनीही ६६ धावांची भागिदारी रचल्यानंतर हार्दिक पांड्याने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर हार्दिकच्या गोलंदाजीने कर्णधार स्टीव्ह स्मिथलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पण ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टॉयनिस आणि अॅलेक्स केरीने सावध खेळी करून ऑस्ट्रेलियाला २०० धावांच्या आसपास पोहोचवलं. त्यानंतर एबॉट (२६) आणि एगरच्या (१७) धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २५० धावांचा टप्पा गाठला. ऑस्ट्रेलियाने ४९ षटकांत सर्वबाद २६९ धावा केल्या असून टीम इंडियाला विजयासाठी २७० धावा कुटाव्या लागणार आहेत.
SD Social Media
9850 60 3590