भारतासाठी टोकियो ऑलिम्पिक यशस्वी ठरले आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताला एकूण ७ पदकं मिळाली. त्यातही शनिवारी (७ ऑगस्ट) भारतासाठी भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णमयी कामगिरी केली. त्याने पुरुषांच्या भालाफेक क्रीडाप्रकारात सर्वात लांब भाला फेकत ऐतिहासिक सुवर्णपदकाची कमाई केली. त्याच्या या यशानंतर त्याच्यावर बक्षीसांचा वर्षाव होत आहे. महिंद्रा आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी घोषणा केली की, ते नीरजला त्याच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी XUV 700 भेट देतील.
यापुढे 7 ऑगस्ट 2021, तारीख भारतीय ॲथलेटिक्सच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरली जाईल. याचे श्रेय भालाफेकपटू नीरज चोप्राला जाते. ज्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर भाला फेकत सुवर्णपदक जिंकले. तो नेमबाज अभिनव बिंद्रानंतर ऑलिम्पिक खेळांमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय आहे.
त्याच्या या पराक्रमामुळे भारताची ॲथलेटिक्समधील ऑलिम्पिक पदकाची 121 वर्षांची प्रतीक्षा नक्कीच संपली.
नीरजवर लोकांनी सोशल मीडियाद्वारे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यातच महिंद्रा आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी नीरजला XUV 700 भेट देण्याची घोषणा केली.
एका ट्विटर वापरकर्त्याने आनंद महिंद्रा यांना नीरजसाठी XUV 700 बद्दल विचारले. प्रत्युत्तरात, महिंद्रा समूहाच्या अध्यक्षांनी त्यास सहमती दर्शवली आणि सांगितले की, ही भारताच्या ‘गोल्डन ॲथलीट’साठी माझ्याकडून वैयक्तिक भेट असेल. एवढेच नव्हे तर, त्याने सुवर्णपदक विजेत्यासाठी कार तयार ठेवण्यासाठी त्याच्या कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना टॅग केले.