एसटीतील कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यातील पगार लवकरच देण्यात येणार

ऐन दसऱ्याच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न सुटला आहे. एसटी महामंडळाला मानव विकास योजनेतील 231 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यामुळे एसटीतील 93 हजार कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यातील पगार लवकरच देण्यात येणार आहे. त्यामुळे एसटी कामगारांचा दसरा गोड होणार आहे.

ग्रामीण भागातील सर्वच मुलींना इयत्ता 12 वी पर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे, या करीता गाव ते शाळा दरम्यान वाहतूकीची मोफत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी “मानव विकास कार्यक्रम” अंतर्गत योजना राबविली जाते. त्यासाठी राज्य शासनाकडून निधी दिला जातो. या योजनेतंर्गत एस.टी. महामंडळाच्या बस वाहतूकीच्या खर्चापोटी राज्य शासनाकडून सन 2013-14 पासून रक्कम देणे प्रलंबित होते. तसेच इंधन किमतीची दरवाढ, चालनीय किलोमीटर तफावत, चालक व वाहक यांचे वेतनवाढ व बसेसच्या देखभाल व दुरुस्तीचा वाढीव खर्च इ. विचार करुन पुर्वलक्षी प्रभावाने सन 2013-14 पासून वाढीव दराने अनुदान देण्याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची वेळोवेळी बैठक घेतल्या होत्या.

यावेळी परब यांनी एस.टी. महामंडळास एकूण 428 कोटी 88 लाख 62 हजार 200 इतका निधी मंजूर करुन घेतला. तसेच तो निधी देण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन मे, 2021 महिन्यात पहील्या टप्यातील 197 कोटी 58 लाख 40 हजार रुपायांच्या अनुदानाची रक्कम यापर्वीच एस.टी. महामंडळाला मिळाली आहे.

दरम्यान आज दुसऱ्या टप्प्यातील 231 कोटी 30 लाख 22 हजार 200 रूपयांचा निधी एस.टी. महामंडळाला देण्याबाबत निर्देश संबंधित विभागाला राज्य शासनाने दिले आहेत. त्याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. या निधीमधून एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न सुटणार असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असं एसटी महामंडळाने सांगितलं.

मागील वर्षी कोरोनामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झालेला होता. त्यामुळे कामगारांना पगार देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नव्हते. परिणामी कामगारांचे वेतन थकीत होते. त्यामुळे गेल्या वर्षी एसटी बस वाहतूक बंद असताना शासनाकडून मिळालेल्या एक हजार कोटी रुपयांच्या निधीतून कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले होते. त्यानंतर सवलत मूल्याच्या रक्कमेतून अकराशे कोटी, असे एकुण 2 हजार शंभर काेटी रुपये दिल्याने जून महिन्यापर्यंतचे पगार महामंडळाने दिला आहे. पण, आता हा निधीसुद्धा संपला असून कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण संख्या घटली असले तरी एसटीच्या सुमारे दहा हजार बस रस्त्यावर धावत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.