देशाचे पहिले सीडीएस म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचं अपघाती निधन झालंय. संपूर्ण भारतीय लष्कराची कमान ते सांभाळत होते. पण त्यांच्या निधनानं आता सीडीएसचं (CDS) पद रिकामं झालंय. उद्या जनरल रावत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. पण सीडीएससारखं सर्वोच्च लष्करी पद हे फार काळ रिकामं नाही ठेवता येणार. त्यातही चीन आणि पाकिस्तानच्या ज्या कुरापती सुरु आहेत, त्या पार्श्वभूमीवर तर नाहीच नाही. त्यामुळेच जनरल रावत यांच्या निधनानंतर आता नवे सीडीएस कोण होणार याची चर्चा सुरु झालीय. आणि त्यासाठी एकमेव आणि आघाडीवरचं नाव आहे सध्याचे लष्कर प्रमुख मनोज मुकूंद नरवणे. काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सीसीएसची मिटींग झाली. कमिटीत देशाच्या लष्करासंबंधीच्या सर्व निर्णयाची चर्चा होते. निर्णय घेतले जातात. जनरल रावत यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर सीसीएसची (CCS) बैठक झाली.
सध्यस्थितीत जनरल एमएम नरवणे हेच देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी आहेत. त्यातही जनरल रावत यांनी गेल्या काही काळात सीडीएस म्हणून जे काही प्रोजेक्ट सुरु केलेत, काम हाती घेतलेत, त्याची माहिती आणि अनुभव हा सर्वाधिक जनरल नरवणेंनाच आहे. कारण नरवणे हे सध्याचे लष्करप्रमुख आहेत. सध्याचे वायूदल प्रमुख व्ही.आर.चौधरी हे सुद्धा मराठीच आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण नांदेडमध्ये झालेलं आहे. त्यांनी अलिकडेच इंडियन एअरफोर्सची जबाबदारी हाती घेतलीय. तर नेव्ही प्रमुख असलेल्या आर हरीकुमार यांनीही 30 नोव्हेंबरला सूत्रे हाती घेतलीयत. त्यामुळेच सीडीएसच्या पदासाठी जनरल नरवणेंची जी पात्रता, अनुभव आहे ती इतरांकडे नाही. त्यामुळेच जनरल नरवणेंचं नाव आघाडीवर आहे.
जनरल नरवणे हे पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये निवृत्त होणार. लष्करप्रमुख म्हणून त्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपतोय. लष्करी नियमानुसार सीडीएसला 65 वर्ष वयापर्यंत त्या पदावर रहाता येतं. तर इतर तीनही सैन्यदल प्रमुखांना वयाच्या 62 वर्षापर्यंत त्या पदावर रहाता येतं. किंवा तीनच वर्षे त्या पदावर रहाण्याची अट आहे. त्यानंतर मात्र ते निवृत्त होतात. जनरल नरवणे निवृत्त झाल्यानंतर सीडीएस पदावर रहाण्यासाठी सर्व पात्रता पूर्ण करतात. त्यामुळेच सीडीएसचे फ्रंट रनर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. लष्कराचे जे तीन दल आहेत-त्यांच्यात समन्वय ठेवण्याचं काम सीडीएस करतात. ट्रेनिंग-लॉजिस्टीक्स, कोणत्या दलाला, काय हवं काय नको, ते तातडीनं कसं होईल याची जबाबदारी सीडीएस पार पाडतात. तिनही दलात समन्वय ठेवून लष्कराची एनर्जी ठेवण्याचं प्रमुख कामही सीडीएसचच आहे.