कोरोना (Corona) विषाणू संसर्ग कमी होऊन सर्व पूर्वपदावर येईल असं वाटत असताना ओमिक्रॉनच्या (Omicron) वेरिएंटचं संकट उभं राहिलं आहे. राज्यात सध्या ओमिक्रॉनचे 10 रुग्ण आहेत. ओमिक्रॉनचं संकट वाढल्यास यंदा देखील दहावी आणि बारावीच्या (SSC HSC exam) परीक्षांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. बोर्डाच्या नियोजनानुसार परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु करण्यात येतात. कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मूल्यांकनाचा दुसरा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. याबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरुन घेतला जाईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं बारावी प्रमाणे दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थी नियमित शुल्कासह 20 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करु शकतात. तर, विलंब शुल्कासह अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 28 डिसेंबरपर्यंत आहे.
दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचं आयोजन करण्यासाठी बोर्डाकडून तयारी सुरु आहे. वेळापत्रक तयार करण्यात आलं असून शासनाच्या मान्यतेची आवश्यकता आहे. तर परीक्षा केंद्र, कोरोना नियमांचं पालन आणि परीक्षक यासंदर्भात माहिती मागवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात सीबीएसई प्रमाणं दहावी आणि बारावीसाठी सेमिस्टर पद्धत लागू करण्यात आलेली नाही. मात्र, शाळा पातळीवर घटक चाचणी आणि प्रथम सत्राच्या परीक्षा पार पडलेल्या आहेत. त्यामुळं ओमिक्रॉनचं संकट वाढल्यास शालेय पातळीवर दुसऱ्या सत्राची परीक्षा घेतली जाऊ शकते.
दरम्यान, दहावी बारावीच्या शाळा नियमित आणि व्यवस्थित सुरु असल्यानं विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावं. परीक्षा घेण्याच्या काळात आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास पर्यायाचा विचार होईल. मात्र, सध्या विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावं, असं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.