पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज पहिल्याच दिवशी मागे घेतला. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. पहिल्यांदाच अजित पवार यांना जिल्हा बॅंकेत बिनविरोध निवडून येण्याची संधी मिळाली.
संचालक पदाच्या 21 जागांसाठी 299 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर 10 उमेदवारांचे अर्ज बाद झाले, तर चौघा जणांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. बुधवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत सुरु झाली, त्यावेळी सतीश काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालक पदी उपमुख्यमंत्री अजित पवार बिनविरोध निवडून आले. अजित पवार यांचा अ वर्ग मतदारसंघातून अर्ज आहे.
अजित पवार यांच्यासह सर्व विद्यमान संचालक निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवारांचा अर्ज बाद झाल्याने भोरमधून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate) आणि पुरंदर हवेलीचे काँग्रेस आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) बिनविरोध निवडून आले आहेत. तर आंबेगाव तालुक्यातून सोसायटी ‘अ’ वर्ग गटातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड आधीच निश्चित झाली होती.
भाजपच्या वतीने बहुतेक सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करून राष्ट्रवादीसमोर सध्या तरी आव्हान उभे केले आहे. आठ मतदार संघातील तब्बल 5 हजार 166 मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.
पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती. 1991 पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे