विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या जागा रिक्त आहेत. या जागांसाठी नियुक्त करण्याच्या आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे राज्य सरकारने पाठविली आहे. मात्र, या यादीवर अजूनही राज्यपालांनी सही केलेली नाही. यावरून राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये सुप्त संघर्ष सुरु आहे. गेले काही दिवस हा संघर्ष थांबला होता.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठाच्या विशेष दीक्षांत समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोशारी , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, कुलगुरू सुहास पेडणेकर , प्र कुलगुरू, कुलसचिव, सिनेट पदाधिकारी उपस्थित होते.
विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात तबला वादक पद्मभूषण झाकीर हुसेन यांना डॉक्टर ऑ लॉ ( एल एल डी ) आणि प्रसिद्ध उद्योजक शशिकांत गरवारे यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर ( डि. लीट.) या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, लहानपणी ज्यांना टीव्हीवर पाहत आलो आहे ते झाकीर हुसेन आज या कार्यक्रमात आहेत. आज मंत्री म्हणून त्यांच्यासोबत या कार्यक्रमात बसलो. त्यांना ही पदवी दिली.
28 सप्टेंबरला लता दीदीच्या जयंतीदिवशी देशातील पहिलं भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय सुरू होईल. लता मंगेशकर असताना आम्ही हे महाविद्यालय सुरू करू शकलो नाही याचे आम्हाला दुःख वाटत आहे असे ते म्हणाले.
राज्यपाल महोदय असताना मी येईन की नाही अशी भीती कुलगुरू सुहास पेडणेकर यांना वाटत होती. पण, शिक्षण क्षेत्र पुढे नेण्यासाठी राज्यपालांच्या नेतृत्वाखाली एक कार्यकर्ता म्हणून मी काम करायला तयार आहे, असे त्यांनी सांगितले