भारतीय महिला क्रिकेट संघ ट्वेन्टी-२० तिरंगी क्रिकेट मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध मैदानात उतरेल तेव्हा संघाचे लक्ष्य आपली विजयी लय कायम राखण्याचे असेल. कर्णधार हरमनप्रीत कौरसह अनेक आघाडीच्या खेळाडू अस्वस्थ असल्याने संघाबाहेर असूनही भारताने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नमवत मालिकेला चांगली सुरुवात केली. हरमनप्रीतसह अन्य खेळाडूंच्या विंडीजविरुद्धच्या सामन्यात पुनरागमनाबाबत मात्र अनिश्चितता आहे.
विंडीजला आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत व्हावे लागले. पहिल्या सामन्यात पदार्पणातच अमनजोत कौरने चमकदार कामगिरी केली. भारताची अवस्था एक वेळ ५ बाद ६९ अशी बिकट होती. यानंतर अमनजोतने ३० चेंडूंत ४१ धावांची खेळी केली, त्यामुळे भारताला ६ बाद १४७ धावसंख्येपर्यंत पोहोचता आले. विंडीजविरुद्धच्या सामन्यात वरिष्ठ खेळाडूंचे संघात पुनरागमन झाल्यासही सर्वाच्या नजरा २१ वर्षीय अमनजोतवर असतील. भारताचा प्रयत्न या सामन्यात विजय मिळवत मालिकेतील आपली स्थिती मजबूत करण्याचा असेल.
वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत अनुभवी अष्टपैलू दीप्ती शर्मावर संघाची मदार असेल. दुसरीकडे, विंडीजला भारतासमोर आव्हान उपस्थित करायचे झाल्यास त्यांना सर्वच विभागांत चांगली कामगिरी करावी लागेल.
- वेळ : रात्री १०.१५ वा.
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २