हॉकी विश्वचषक स्पर्धेत १९७५ नंतर प्रथमच विजयमंचावर येण्याचे भारतीय हॉकी संघाचे स्वप्न पुन्हा एकदा भंग पावले. किलगा मैदानावर रविवारी झालेल्या क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडने नियोजित वेळेतील ३-३ अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआउटमध्ये भारताचा ५-४ असा पराभव केला. न्यूझीलंडची उपांत्यपूर्व फेरीत आता बेल्जियमशी गाठ पडणार आहे.
जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाला या सामन्यात आपला खेळ दाखवता आला नाही. सामन्यातील २-० अशा आघाडीनंतर भारतीय संघाने न्यूझीलंडला सामन्यात डोके वर काढण्याची संधी दिली आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवत न्यूझीलंडने भारताला नियोजित वेळेत ३-३ असे बरोबरीत रोखले.
सामन्याच्या पूर्वार्धात १७व्या मिनिटाला ललित उपाध्याय आणि २४व्या मिनिटाला सुखजीत सिंगने गोल करून भारताला २-० असे आघाडीवर नेले होते. त्यानंतर चारच मिनिटांनी न्यूझीलंडच्या सॅम लेनने २८व्या मिनिटाला गोल करून मध्यंतरापर्यंत भारताची आघाडी २-१ अशी मर्यादित राखली होती. उत्तरार्धात ४०व्या मिनिटाला वरुण कुमारने गोल करून भारताला पुन्हा आघाडीवर नेले. मात्र, पुन्हा एकदा न्यूझीलंडने भारताच्या गाफील राहण्याचा फायदा उठवला. सहा मिनिटांत दोन गोल करून न्यूझीलंडने बरोबरी साधली. सामन्याच्या ४३व्या मिनिटाला प्रथम केन रसेलने, तर ४९व्या मिनिटाला सीन फिंडलेने गोल केला.
नियोजित वेळेनंतर घेण्यात आलेल्या शूटआउटमध्येही पहिल्या पाच प्रयत्नांनंतर बरोबरी कायम राहिली होती. अखेरीस सडन-डेथमध्ये न्यूझीलंडने बाजी मारली. सडन-डेथमध्ये कर्णधार हरमनप्रीतला गोल करण्याची चांगली संधी होती. मात्र, त्याला गोलजाळीचा वेध घेता आला नाही. शूटआउटमध्ये गोलरक्षक श्रीजेशने २-३ अशा पिछाडीनंतर न्यूझीलंडचे दोन प्रयत्न हाणून पाडताना भारताच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित केल्या होत्या. त्यानंतर सडन-डेथमध्येही श्रीजेशने न्यूझीलंडचा एक प्रयत्न फोल ठरवला. त्या वेळी तो जखमी झाल्यामुळे नंतर तीन शॉट्ससाठी क्रिशन बहादूर पाठकला संधी देण्यात आली. हरमनप्रीतपाठोपाठ समशेरचाही प्रयत्न चुकला आणि अखेरचा प्रयत्न न्यूझीलंडच्या सॅम लेनने यशस्वी करताना न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यापूर्वी, झालेल्या सामन्यात स्पेननेही नियोजित वेळेतील २-२ अशा बरोबरीनंतर शूटआऊटमध्येच मलेशियाचा ४-३ असा पराभव केला.