आज दि.२४ जानेवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

शेअर बाजार तब्बल 1900 हून
अधिक अंकांनी घसरला

जगभरातील शेअर बाजारांमधील नकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर FII ने गेल्या आठवड्यांपासून विक्रीचा सपाटा केला होता. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दुपारी 2.15 वाजेपर्यंत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेंसेक्स तब्बल 1900 हून अधिक अंकांनी घसरले आहे. एकाच सत्रात बाजार तब्बल 3 टक्क्यांहून अधिक घसरून 57,229 अंकांवर व्यवहार करीत होते. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक निफ्टी 500 अंकांनी घसरून 17000 अंकांवर व्यवहार करीत होते. गुंतवणूकदारांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे.

शिवसेनेला बाळासाहेबांनी
सडत ठेवलं का? : फडणवीस

सोयीचा इतिहास आणि निवडक विसरणं या दोन गोष्टी प्रामुख्याने उद्धव ठाकरेंच्या भाषणात पहायला मिळाल्या. २५ वर्ष आम्ही युतीत सडलो असं ते म्हणाले. पण २०१२ पर्यंत या युतीचे नेते हे स्वत: वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते. या युतीचा निर्णय त्यांनी केला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का? भाजपासोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी सडत ठेवलं का? असा विचार आमच्या मनात येत आहे,” असं फडणवीस म्हणाले.

शरद पवार यांना करोनाची लागण,
पंतप्रधान यांच्याकडून चौकशी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना करोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी ट्वीट करत आपल्याला करोना संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व पक्षातील राजकीय नेत्यांनी त्यांची चौकशी करत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचं काही कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी.

राज्यात सध्या गारठा वाढला

राज्यात सध्या गारठा वाढला आहे. गेल्या 10 वर्षातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा खाली गेला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दुसरीकडे धुळीच्या वादळामुळे मुंबईवर धूलिकरणांचं मळभ आहे. त्यामुळे श्वसनाचे आजार होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. धुळीच्या वादळानं मुंबईकरांचा श्वास कोंडला असतानाच मुंबईकरांना हुडहुडी भरविली आहे.

लष्करासाठी आणखी २००
K-9 तोफा विकत घेणार

गेली काही महिने चीनच्या सीमेवरील तणाव लक्षात घेता आणि दोन्ही सीमेवर लढाई करण्याची वेळ आली तर तयारीच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी संरक्षण दल लष्करासाठी दक्षिण कोरियाचे तंत्रज्ञान असलेल्या आणखी २०० K-9 तोफा विकत घेणार आहे. यासाठी लवकरच भारतात या तोफांची निर्मिती करणाऱ्या लार्सन अँड टुर्बोला २०० तोफांची ऑर्डर दिली जाणार असल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ
द इयर साठी स्मृतीची निवड

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना हिची आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे. स्मृतीला दुसऱ्यांदा हा सन्मान मिळाला आहे. यापूर्वी २०१८ मध्ये तिला हा पुरस्कार मिळाला होता. पुरुष गटात यावर्षी कोणत्याही भारतीय खेळाडूला कोणत्याही प्रकारात पुरस्कार जिंकता आला नाही. भारताच्या एकाही खेळाडूला आयसीसीच्या एकदिवसीय आणि टी-२० संघात स्थानही मिळवता आले नाही. स्मृतीने गेल्या वर्षी २२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३८.८६च्या सरासरीने ८५५ धावा केल्या होत्या.

शरजील इमामवर चालणार
देशद्रोहाचा खटला

दिल्ली दंगलीशी संबंधित खटल्यांमध्ये आरोपी असलेल्या शरजील इमामवर देशद्रोह, यूएपीएसह इतर अनेक कलमे लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधी निदर्शनादरम्यान शरजीलने केलेल्या चिथावणीखोर भाषणांमुळे त्याच्यावर ही कलमे लावली जातील. शरजीलने उत्तर प्रदेशमधील अलीगढ विद्यापीठ आणि दिल्लीतील जामिया परिसरात ही भाषणे दिली होती. १६ जानेवारी २०२० रोजी त्यांनी मुस्लिम विद्यापीठात दिलेल्या भाषणासाठी, आसाम, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, नवी दिल्ली, मणिपूर या पाच राज्यांच्या पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता.

बांधकामासाठी ऑफलाइन परवानगी
देण्यास 31 मार्च पर्यंत मुदतवाढ

राज्य सरकारने बांधकामासाठी ऑफलाइन बांधकाम परवानगी देण्यास येत्या 31 मार्च 2022 पर्यंत मुदवाढ दिली आहे. राज्य सरकारने युनिफाइड डीसीपीआर लागू केला. त्यानंतर ऑनलाइन सॉफ्टवेअरमध्ये परवानग्यांची प्रकरणे दाखल करण्याच्या सूचना दिल्या. सॉफ्टवेअरची बत्ती नेहमी गुल होऊन ते हँग व्हायचे. परवानगीसाठी अर्ज केलेल्यांना ताटकळत बसावे लागायचे.

सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे
संकेतस्थळ अवघ्या तीन मिनिटात हॅक

ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट म्हणून ओळख असलेल्या पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नामांकित विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. याच सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे संकेतस्थळ (website) अवघ्या तीन मिनिटात एथिकल हॅकरने हॅक केल्याची घटना घडली आहे. इतकंच नव्हे तर संकेतस्थळाच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटीही दाखवून दिल्या आहेत. संकेतस्थळाच्या ऑनलाईन प्रणालीतील त्रुटी तातडीने दूर करण्याची तातडीनं गरज असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आली आहे.

पीव्ही सिंधूने जिंकली BWF
सुपर 350 सय्यद मोदी स्पर्धा

भारताची दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधूने BWF सुपर 350 सय्यद मोदी स्पर्धा जिंकली आहे. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सिंधूने युवा स्टार मालविका बनसोडचा अवघ्या 35 मिनिटांत पराभव केला. सिंधूने 21-13, 21-16 अशा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. माजी विश्वविजेत्या सिंधूचे सय्यद मोदी स्पर्धेतील हे दुसरे विजेतेपद आहे. यापूर्वी 2017 मध्येही तिने या BWF वर्ल्ड टूर सुपर 300 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.