आयपीएलच्या 44 व्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने हैद्राबादवर विजय मिळवत प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. हैद्राबादवर 7 विकेट्सनी विजय मिळवत यंदाच्या पर्वात सर्वात प्रथम प्लेऑफमध्ये संघाला स्थान मिळवून देणाऱ्या धोनीने सोबतच एक दमदार रेकॉर्डही स्वत:च्या नावावर केलं आहे. चेन्नई सुपरकिंग्स संघाकडून तब्बल 100 हून अधिक झेल धोनीने टीपले आहेत.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सनंतर सर्वाधिक चषक जिंकणारा संघ चेन्नई सुपरकिंग्सचं आहे. त्यांनी 2010, 2011 आणि 2018 साली विजेतेपद मिळवलं आहे. दरम्यान 2008 पासून चेन्नई संघ आयपीएलमध्ये खेळत असून तेव्हापासून धोनीने जवळपास सर्वच सामन्यात संघाचं नेतृत्त्व केलं आहे. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार म्हणून धोनीने 200 वा सामना खेळला होता. दरम्यान 200 सामने खेळल्यानंतर धोनीने आता 100 वा झेल टीपत हाही रेकॉर्ड नावावर केला आहे. या कामगिरीबद्दल चेन्नई सुपरकिंग्सने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायजर्स हैद्राबाद संघाकडून मोठा स्कोर होईल अशी आशा सर्वांना होती. संघ शारजाहच्या मैदानावर षटकारांचा पाऊस पाडेल असे वाटत होते. त्यातच मागील सामन्यातचं संघात समाविष्ट झालेला जगाती उत्तम टी 20 फलंदाज जेसन रॉयही चांगली कामगिरी करेल असे वाटत होते. पण तो केवळ 2 धावा करुन बाद झाला. संपूर्ण संघामध्ये रिद्धिमान साहाने 44 धावा करत एकहाती झुंज दिली.
पण त्याला सोबत न मिळाल्याने संघ मोठी धावसंख्या करु शकला नाही. साहाशिवाय अब्दुल आणि अभिषेक यांनी प्रत्येकी 18 धावा केल्या. ज्यामुळे 20 षटकात हैद्राबादचा संघ केवळ 134 धावांच करु शकला. याऊलट चेन्नईकडून गोलंदाजीही चोख झाली. जोश हेझलवुडने एका षटकात दोन विकेट घेत संपूर्ण सामन्यात 3 विकेट घेतल्या. याशिवाय़ ब्राव्होने 2 आणि जाडेजा आणि ठाकूरने प्रत्येकी एक विकेट घेतला.