फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी ठरला, नवं मंत्रिमंडळही ठरलं, सूत्रांची माहिती

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडी सरकार खरंच कोसळतं का हे येणाऱ्या काळात समोर येईलच. पण राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची पूर्ण शक्यता आहे आणि नव्या सरकारच्या शपथविधीचा कार्यक्रमदेखील ठरल्याची चर्चा सुरु आहे. नवं सरकार हे एकनाथ शिंदे आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणार असल्याचा दावा केला जातोय. या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा येत्या रविवारी किंवा सोमवारी आयोजित केला जावू शकतो. सर्वात आधी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे शपथ घेणार, अशी धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात नव्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नव्या मंत्रिमंडळासाठी शिंदे गटाने 10 नावं दिली आहेत. यामध्ये 5 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्रीपदासाठी नावे दिली आहेत. तसेच 2 अतिरिक्त कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदावर चर्चा सुरु आहे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटातून कॅबिनेट मंत्रिमंडळासाठी एकनाथ शिंदे, दादा भुसे, दिपक केसरकर, संजय राठोड, तानाती सावंत, बच्चू कडू आणि आशिष जैस्वाल यांची नावे सूचवण्यात आली आहेत. तर राज्यमंत्रिपदासाठी अनिल बाबर, राजेंद्र यड्रावरकर, भरत गोगावले, सदा सरवणकर, चंद्रकांत पाटील यांची नावे देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत.

संबंधित माहिती ही सूत्रांनी दिलेली आहे. या माहितीबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. याशिवाय भाजपही अद्याप समोर आलेली नाही. पण त्याआधीच शिंदे यांच्या गोटातील सूत्रांनी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत अनेक दावे केले आहेत. दुसरीकडे शिवसेनेकडून 12 आमदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्यावर शिंदे यांनी ट्विटरवर प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना परतण्याचं आवाहन करण्यात येत आहे. तसेच 24 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात येतोय. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील सरकार स्थिर असल्याचं विधान केलं आहे. त्यामुळे आणखी जर वेळ झाला तर आमदारांवरची पकड सैल होऊ शकते, अशी शिंदे यांना भीती आहे. त्यामुळे जलद गतीने घडामोडी घडवण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.