आज दि.२३ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

शिवसेनेच्या शिंदे गटाकडून सरकार स्थापनेच्या हालाचालींना जोरदार सुरुवात

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडून आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना जोरदार सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना शिंदे गटाकडून पत्र प्राप्त झालं आहे. या पत्रात शिंदे गटातील सर्व आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवळ यांचा संपर्क करुन शिंदे गटाकडून सर्व प्रयत्न सुरु आहेत.

एकनाथ शिंदे यांना जवळपास 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा काढल्यास महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाने पाठिंबा काढण्याच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमधून पाठिंबा काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचं विधान केलं आहे.

राष्ट्रवादीमध्ये ‘ऑल इज नॉट वेल’, फूट पडण्याच्या भीतीनं 24 तासांमध्ये बदलली भूमिका

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडी पक्षातील चलबिचल या बंडामुळे समोर आली आहे. शिवसेना आमदारांमधील नाराजी जाहीर पत्रातून बाहेर आली असतानाच राष्ट्रवादीमध्येही सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 24 तासांपूर्वी सरकारच्या पाठिशी भक्कम राहण्याची भूमिका राष्ट्रवादीनं बदलली असल्याची माहिती सूत्रानी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची आज वाय.बी. चव्हाण सेंटर येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर  राष्ट्रवादी काँग्रेस आता महाविकास आघाडी सरकारमधून पाठिंबा काढणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 24 तासांपूर्वी सरकारच्या पाठिशी भक्कमणे राहण्याची भूमिका राष्ट्रवादीनं जाहीर केली होती. पण, आजच्या बैठकीत आमदारांनी मांडलेल्या भूमिकेनंतर पक्षात फुट पडू नये म्हणून राष्ट्रवादीनं भूमिका बदलली असल्याचं मानलं जात आहे.

एकीकडे राजकीय वादळ तर दुसरीकडे MPSC ची मोठी घोषणा; तब्बल 800 जागांसाठी पदभरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहायक कक्ष अधिकारी गट-ब, राज्य कर निरीक्षक गट-ब, पोलीस उप निरीक्षक गट-ब, दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-पोलीस उप निरीक्षक गट-ब या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 असणार आहे.

आता नॅशनल पार्कमध्ये तो ‘बिबट्या’ कायमच दिसणार 3 पायांवर

बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये काही दिवसांपूर्वीच तारेच्या फासामध्ये पाय अडकून एक बिबट्या जखमी झाला होता. नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी बिबट्यावर शस्त्रक्रिया केली. ती यशस्वीही झाली, पण त्या शस्त्रक्रियेत बिबट्याला एक पाय गमवावा लागला. परंतु, आता हा बिबट्या पार्कमध्ये 3 पायांवर यशस्वीपणे वावरत आहे. 

राजकीय भूकंपाचा भाजप आहे का सूत्रधार? मेघालयचे मुख्यमंत्री बंडखोर आमदारांच्या भेटीला, खलबतांना वेग

शिवसेनेचे तब्बल 41 ते 43 आमदार आमच्यासोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यानंतर ते सुरतहून आसामच्या गुवाहाटीला रवाना झाले आहे. काही वेळापूर्वीच शेजारील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी हॉटेलमध्ये आल्याचं सांगितलं जात आहे. मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा हे हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये दाखल झाले आहेत. कॉनराड संगमा हे नॅशनल पीपल्स पार्टीचे प्रमुख आहेत. संगमा हे भाजप समर्थक आहेत. भाजपनेच या मुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी पाठवलं का? अशी चर्चाही सुरू आहे.

दरम्यान महाराष्ट्रात मात्र उद्धव ठाकरेंच्या समर्थनात असलेल्या आमदारांनी धक्कादायक आरोप केले आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचं बंड हे भाजपने घडवून आणलं असल्याचा आरोप केला आहे. या बंडात 50 टक्के भाजप आणि 50 टक्के ईडीचा वाटा असल्याचा धक्कादायक आरोप या अपक्ष आमदाराने केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक तज्ज्ञांनी या सर्व कटामागे भाजप असल्याचा दावा केला जात आहे. 

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर ; ५५ लाख नागरिकांना फटका; बचावकार्य सुरूच

मुसळधार पावसामुळे ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने आसाममध्ये पूरस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. आतापर्यंत ३२ जिल्ह्यांतील ५५ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. 

मे महिन्याच्या मध्यापासून आसाममध्ये आतापर्यंत दोन टप्प्यांत पूर आला. यामध्ये ८९ जणांचा बळी गेला. मुख्यमंत्री हेमंता बिश्व सरमा यांनी बुधवारी ट्रेनमधून नगांव जिल्ह्याचा दौरा करून येथील पुरामुळे निर्माण झालेल्या स्थितीची माहिती घेतली. नगांव हा पुरामुळे सर्वात अधिक नुकसान झालेला जिल्हा आहे. या जिल्ह्यातील साडेचार लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामधील १५ हजार १८८ जणांनी १४७ मदत शिबिरांमध्ये आश्रय घेतला आहे.

राजकीय स्फोटामागे अजित पवारांची ‘दादा’गिरी जबाबदार? काँग्रेसकडूनही नाराजीचा सूर

शिवसेनेत सुरु असलेल्या अंतर्गत कलहानंतर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आता महाविकास आघाडी सरकारमधून पाठिंबा काढणार असल्याची दाट शक्यता आहे. त्यातच आता अजित पवारांबाबतची नाराजी समोर आली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही बऱ्याचदा अनरिचेबल असल्याची तक्रार आमदारांकडून केली जात आहे.

मुख्यमंत्री भेटेना आणि उपमुख्यमंत्री जगू देईना, अशी स्थिती निर्माण झाल्याचंही सांगितलं जात आहे. अडीच वर्षांच्या या कार्यकाळात निधीवरुनही अनेकदा आमदारांना त्रास सहन करावा लागल्याचा आरोप आहे. केवळ शिवसेनेतच दादांबद्दल नाराजी नव्हती. तर काँग्रेसमध्येही दादांबद्दल विरोधाचा सूर होता.

अफगाणिस्तानात भूकंपाचे धक्के ; १००० मृत्युमुखी, दीड हजारांवर जखमी

अफगाणिस्तानच्या पूर्व भागात बुधवारी पहाटे झालेल्या ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या मोठय़ा भूकंपाच्या धक्क्यामुळे एक हजार जण मृत्युमुखी पडले, तर सुमारे दीड हजारांवर जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानच्या ‘बख्तर’ या अधिकृत वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. भूकंपग्रस्तांसाठी मदत व बचावकार्य सुरू असले तरी त्यात अडथळे येत आहेत. भूकंपग्रस्त ग्रामीण भाग प्रामुख्याने डोंगराळ असल्यानेही अडचणी येत आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याचीही भीती व्यक्त होत आहे. गेल्या दोन दशकांतील अफगाणिस्तानमध्ये आलेला हा सर्वात विनाशकारी भूकंप आहे.

घटस्फोटांच्या चर्चांवर भडकला सिद्धार्थ जाधव

प्रेक्षकांचा लाडका ‘आपला सिद्धू’ म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ जाधव गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला होता. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती अक्कलवार यांच्यात दुरावा निर्माण झाला असून त्यांनी घटस्फोट केल्याच्या चर्चां सुरू होत्या. सोशल मीडियावर या चर्चांना उधाण आलेलं असताना अभिनेता सिद्धार्थ जाधवनं या सगळ्यावर चांगलाच राग व्यक्त केला असून ‘सब कुछ ठिक है’ असं म्हणत सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.  हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सिद्धार्थनं ही माहिती दिली आहे. त्यामुळे सिद्धार्थ जाधवच्या घटस्फोटाच्या अफवा असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.