राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना त्यांचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. संभाजीराजेंना शह देण्यासाठी कोल्हापूरमधून शिवसैनिकाला उमेदवारी देण्याची तयारी शिवसेनेनं सुरू केल्याची चर्चा आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील प्रलंबित 13 महानगरपालिकांच्या प्रभागांची आरक्षण सोडत काढण्याचे अधिसूचना जाहीर केली आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना उमेदवार जाहीर करणार
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आज त्यांचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य सभेच्या सहाव्या जागेसाठी ज्येष्ठ शिवसैनिकाचे नाव जाहीर करण्याची शक्यता आहे. येत्या 26 मे रोजी शिवसेना नेते संजय राऊत आणि जाहीर होणारे उमेदवार त्यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
संभाजीराजेंना शिवसेना देणार शह, कोल्हापुरातून देणार दुसरा उमेदवार?
राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेनेनं ऑफर दिली होती. पण, संभाजीराजेंनी सेनेची ऑफर नाकारल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संभाजीराजेंना शह देण्यासाठी कोल्हापूरमधून शिवसैनिकाला उमेदवारी देण्याची तयारी शिवसेनेनं सुरू केल्याची चर्चा आहे.
निवडणूक आयोग लागले तयारीला
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील प्रलंबित 13 महानगरपालिकांच्या प्रभागांची आरक्षण सोडत काढण्याचे अधिसूचना जाहीर केली आहे. नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 13 जूनपर्यंत जाहीर केला आहे.