भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून ओळख असणाऱ्या हॉकी या खेळामध्ये सध्या देशाचा संघ दमदार कामगिरी करताना दिसत आहे. टोकियो येथे सुरु असणाऱ्या ऑलिम्पक स्पर्धेमध्ये खेळवण्यात आलेल्या हॉकी सामन्यांत भारताच्या महिला हॉकी संघानं बाजी मारत उपांत्य पूर्व फेरीमध्ये अर्थात क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
तब्बल चार दशकांनी, म्हणजेच 41 वर्षांनी भारताच्या महिला संघानं ही कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला भारतीय महिला संघांनी 4-3 अशा फरकानं पराभूत केलं. ग्रुप ए मधील लीग सामने जिंकत भारतीय संघाने सहा गुण प्राप्त केले आहेत. आता भारताच्या संघापुढे ग्रुप बी मधील अग्रस्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचं आव्हान असेल. सोमवारी हा सामना खेळवण्यात येणार आहे.
1980 मध्ये भारतीय संघानं मॉस्कोमध्ये आयोजित ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली होती. पण, संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. दरम्यान भारतीय संघातील वंदना कटारिया या खेळाडूच्या गोलची हॅट्रीक या सामन्यातील लक्षवेधी बाब ठरली. 4, 17 आणि 49 व्या मिनिटाला गोल करत तिनं क्रीडारसिकांच्या नजरा वळवल्या, ऑलिम्पिकमध्ये अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
(फोटो क्रेडिट गुगल)