कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर आता संसर्गाची नवीन प्रकरणे पुन्हा वाढू लागली आहेत. देशातील 46 जिल्ह्यांमध्ये संक्रमणाचे प्रमाण 10 टक्क्यांहून अधिक आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता केंद्र सरकारने संबंधित राज्यांना जिल्ह्यांमध्ये कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे आणि लोकांच्या बाहेर पडण्यावर निर्बंध घालण्याचा सल्लाही दिला आहे. केंद्राने 46 जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यास सांगितले आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संबंधित राज्यांना टेस्टींग वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी शनिवारी या राज्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली आणि संसर्गाच्या वाढत्या प्रकरणाबाबत चिंता व्यक्त केली. या राज्यांमध्ये केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा, आसाम, मिझोराम, मेघालय, आंध्र प्रदेश आणि मणिपूर यांचा समावेश आहे.
संसर्ग रोखण्यासाठी या राज्यांनी उचललेली पावले आणि त्यांच्या प्रभावाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. या राज्यांमध्ये संक्रमणाचे प्रमाण वाढत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या राज्यांमधील 80 टक्क्यांहून अधिक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. अशा परिस्थितीत, या लोकांवर कडक नजर ठेवण्यास सांगितले गेले आहे, जेणेकरून ते इतर लोकांच्या संपर्कात येऊ नयेत. गेले सलग चार दिवस, सक्रिय प्रकरणांची संख्या वाढत आहे. केरळमध्ये अधिक प्रकरणे आढळली आहेत. गेल्या 24 तासांमध्ये केरळमध्ये 20 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे वाढली आहेत आणि शंभरहून अधिक मृत्यू झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून दररोज पाचशेहून अधिक रुग्णांनाही आपला जीव गमवावा लागत आहे. सक्रिय प्रकरणे चार लाखांच्या खाली आली होती आणि ती वाढून 4.08 लाखांहून अधिक झाली आहे. गेल्या एका दिवसात सक्रिय प्रकरणांमध्ये 3,765 ची वाढ झाली आहे.
(फोटो क्रेडिट गुगल)