आज दि.१७ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

करोना संसर्गाचा गर्भवती
महिलांवर गंभीर परिणाम

करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान संसर्ग झालेल्या ४ हजारहून अधिक गर्भवती आणि प्रसूतीनंतरच्या स्त्रियांवर अभ्यास करण्यात आला. त्यात असे दिसून आले आहे, की त्यापैकी कमीतकमी १६.३ टक्के महिलांची प्रसूती मुदतीपूर्व झाली. तर, १०.१ टक्के महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाला. हा अभ्यास इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये गुरुवारी प्रकाशित झाला आहे. लेखकांनी करोना साथीच्या पहिल्या लाटेत १ मार्च २०२० ते ३१ जानेवारी २०२१ दरम्यान प्रेगकोविड रजिस्ट्रीचा भाग म्हणून महाराष्ट्रातील १९ ठिकाणी ४२०३ गर्भवती आणि प्रसूती झालेल्या महिलांवर अभ्यास केला आणि त्याचं विश्लेषण केलं.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मराठवाड्यासाठी 8 घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्मांना राज्यातील जनतेच्या वतीने अभिवादन केलं. यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी मराठवाड्यासाठी मोठ्या घोषणा केल्या.यामध्ये मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा तसंच निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी कोणकोणत्या घोषणा केल्या?

  • मराठवाड्यासाठी संतपीठ व्हावं
  • निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार
  • औरंगाबाद आणि अहमदनगर रेल्वेने जोडण्याचं रेल्वे राज्यमंत्र्यांना आवाहन
  • औरंगाबाद आणि शिर्डी विमानसेवा सुरु करण्याची संकल्पना
  • मराठवाड्यासाठी 200 मेगावॅट सौरउर्जा प्रकल्प उभारणार
  • घृष्णेश्वर सभामंडप उभारणार
  • औरंगाबादला पर्यटन समृद्ध
  • परभणीत शासकीय महाविद्यालय

अभिनेता साहिल खान विरोधात गुन्हा दाखल, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या बॉडीबिल्डर मनोज पाटीलच्या आरोपानंतर कारवाई

मिस्टर इंडिया पुरस्कार पटकावणारा बॉडी बिल्डर मनोज पाटील याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अभिनेता साहिल खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बुधवारी रात्री मनोज पाटीलनं आत्महत्येचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी मनोज पाटील याने एक सुसाईड नोट लिहिली होती. त्यामध्ये त्याने अभिनेता साहिल खान याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई करत हा गुन्हा दाखल केला आहे.
मनोज पाटीलला आत्महत्येचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अभिनेता साहिल खान आणि इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय.

अनिल देशमुख यांच्या घरासोबतच
६ ठिकाणी आयकर विभागाचे छापे

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आता आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या काटोल येथील घरासोबतच जिल्ह्यातल्या त्यांच्याशी संबंधित ६ ठिकाणी आयकर विभागानं छापे टाकले आहेत. सकाळच्या सुमारास मोठ्या संख्येनं आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काटोलमधील त्यांच्या घरी दाखल झाले आहेत. आयकर विभागाने नागपूरमधील अनिल देशमुखांच्या घरासोबतच नागपूर विमानतळाजवळील त्यांचं हॉटेल, सोयाबीन केकची फॅक्टरी, एनआयटी कॉलेजमध्ये देखील आयटीच्या पथकानं छापेमारी आहे. यासोबतच, त्यांच्या तीन भागीधारांपैकी दोघांची देखील आयकर विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे.

शरद पवारांच्या मनधरणीसाठी
देशमुखांनी २ कोटी मागितले होते

शरद पवारांच्या मनधरणीसाठी अनिल देशमुखांनी २ कोटी मागितले होते, असा खुलासा सचिन वाझेंने ईडीकडे केला आहे. शरद पवारांनी वाझेला मुंबई पोलीस दलात पुन्हा रुजू करवून घेण्यास विरोध केला होता. यावर अनिल देशमुखांनी पवारांना राजी करण्यासाठी पैसे मागितले होते. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला शरद पवारांना मनवण्यासाठी २ कोटी रुपये खर्च करण्यास सांगितले होते. पैसे भरण्यात असमर्थता दाखवल्यानंतर देशमुखांनी ते वेळेवर देण्यास सांगितले होते, असा दावा वाझेने केला आहे.

पेट्रोल-डिझेल २० ते २५ रुपयांनी
स्वस्त होऊ शकेल

काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात एक भाव आणण्याकरीता पेट्रोल डिझेल GST मध्ये आणण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने आणला. ज्यामुळे पेट्रोल-डिझेल २० ते २५ रुपयांनी देखील स्वस्त होऊ शकेल. तर याला विरोध करणे ही काँग्रेस-राष्ट्रवादीची दुटप्पी भूमिका आहे. मग कालपर्यंच सायकल घेऊन का निघाले होता, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला केला आहे.

चारधाम यात्रा उद्यापासून सुरू होणार

अनेक दिवसांपासून बंद असलेली चारधाम यात्रा पुन्हा सुरू होण्याचा मुहूर्त अखेर निश्चित झाला असून, उद्यापासून (१८ सप्टेंबर) ही यात्रा सुरू होणार आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज(१७ सप्टेंबर) ही घोषणा केली आहे. चारधाम यात्रेला दिलेली स्थगिती उठवतानाच, करोनाविषयक नियमांचे कठोर पालन करून ही यात्रा पार पाडावी, असे निर्देश उत्तराखंड उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेले आहेत. निर्बंधांसह ही यात्रा सुरू होईल, असे मुख्य न्यायाधीश चौहान व न्या. आलोक कुमार वर्मा यांच्या खंडपीठाने यात्रेवरील बंदी उठवताना सांगितलेले आहे.

पद्मनाभ स्वामी मंदिराचे उत्पन्न,
खर्चाच्या ऑडिटचे आदेश द्यावेत

सर्वोच्च न्यायालयाने आज श्री पद्मनाभ स्वामी मंदिर ट्रस्टच्या(जे तत्कालीन त्रावणकोर शाही परिवाराने बनवले होते) एका निवेदनावर आदेश राखून ठेवला आहे. न्यायालयाने प्रशासकीय समितीला निर्देश दिले आहेत की मागील २५ वर्षांपासून मंदिराचे उत्पन्न आणि खर्चाच्या ऑडिटचे आदेश द्यावेत. जसे की, एमिकस क्यूरीचे वरिष्ठ वकील गोपाल सुब्रमण्यम यांनी सूचवले होते. हे लेखापरिक्षण(ऑडिट) प्रतिष्ठित चार्टर्ड अकाउंट्सच्या एका फर्मद्वारे केले जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या
वाढदिवसनिमित्त विविध कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस आहे. मोदी आज ७१ वर्षांचे झाले. याचनिमित्ताने भारतीय जनता पार्टीने आजपासून ७ ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. या २१ दिवसीय कार्यक्रमामध्ये १४ कोटी रेशनच्या पिशव्या, ५ कोटी थँक यू मोदीजी पोस्ट कार्ड, नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत ७१ जागांवर केलं जाणार काम, सोशल मीडियावरील कॅम्पेनसोबतच करोना लसीकरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आणि कार्याची माहिती देणाऱ्या सेमिनार्सचं आयोजन करण्यात येणार आहे.

मंत्री एकनाथ शिंदे यांची
भिडे गुरुजीनी भेट घेतली

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी आज शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या दरे (ता.महाबळेश्वर) या गावी जाऊन भेट घेतली. काल खासदार उदयनराजेंनी बोटीतून जाऊन मंत्री शिंदे यांची भेट घेतली होती, त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी भिडे गुरुजींनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

सुरक्षेचं कारण देत न्यूझीलंडने
पाकिस्तान दौरा केला स्थगित

न्यूझीलंड क्रिकेट संघ तब्बल १८ वर्षानंतर पाकिस्तान क्रिकेट सामने खेळणार होता. मात्र पुन्हा एकदा सुरक्षेचं कारण देत दौरा स्थगित केल्याचं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. शेवटच्या क्षणी न्यूझीलंडने माघार घेतल्याने पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात तीन एकदिवसीय आणि पाच टी २० सामन्यांची मालिका खेळली जाणार होती.

केएल राहुल याच्यात
कर्णधारपदाचे सर्व गुण

विराट कोहली याने विश्वचषकानंतर टी २०चं कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे पुढचा कर्णधार कोण याबाबत क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. तर टी २० संघासाठी रोहित शर्मा हा प्रबळ दावेदार मानला जात आहे. दुसरीकडे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी भारताच्या भावी कर्णधाराबाबत भविष्यवाणी केली आहे. भारतीय फलंदाज केएल राहुल याच्यात कर्णधारपदाचे सर्व गुण असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे त्याला त्यासाठी तयार करणं गरजेचं असल्याचं मत गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.