महाविकास आघाडी सरकार आता अस्तित्वात नाही. हे सरकार अस्तित्वात होतं तेव्हा ते सरकार कोसळण्याच्या विविध चर्चा सुरुवातीपासूनच होत्या. विशेष म्हणजे हे सरकार कोसळण्यामागे महाविकास आघाडीतील धुसफुस हे मुख्य कारण आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत काँग्रेस , शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील धुसफुसीच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर या बातम्या दर महिना-पंधरा दिवसात येऊ लागल्या. ही धुसफूस हेच महाविकास आघाडी सरकार पोखरण्याला कारण ठरली. कारण हे अंतर्गत कलह आधी परस्पर मित्र पक्षाचे एकमेकांविरोधातील होते. त्यानंतर हे कलह पक्षांतर्गत निर्माण झाले. आणि ते आवरणे पक्षश्रेष्ठींसाठी अवघड होवून बसलं. शिवसेनेची झालेली फुट हे त्याचं उत्तम उदाहरण. विशेष म्हणजे शिवसेनेतील ही धुसफूस आणि फुट ताजी असताना काँग्रेसच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
शिवसेना पाठोपाठ आता काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस असल्याची चर्चा सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या धुसफुसीवर बोट ठेवून कारवाईचा बडगा उचलण्याची मागणी केली आहे. 20 जूनला महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक पार पडली. ही अतिशय अटीतटीची लढत होती. विशेष म्हणजे भाजपचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांच्यात ही लढाई असल्याची चर्चा होती. पण निकाल वेगळाच लागला. काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. हा काँग्रेससाठी मोठा झटका होता. विशेष म्हणजे निकालानंतर काँग्रेसच्या सात आमदारांची मते फुटल्याची माहिती समोर आली होती. याच प्रकरणाला पृथ्वीराज चव्हाण यांनी गांभीर्याने घेतलं आहे.
पृथ्वीराज चव्हाणांची कारवाईची मागणी
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेत मोठी फूट पडल्याचं चित्र बघायला मिळालं. त्यानंतर आता काँग्रेसमधीलही अंतर्गत धुसफूस समोर येताना दिसत आहेत. विधान परिषद निवडणुकीत फुटलेल्या सात आमदारांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे ही कारवाई मागणी केली आहे. एका दलित उमेदरावाचा पराभव ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी. या प्रकरणी चौकशी व्हायला हवी. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अनेक आमदारांची सभागृहात अनुपस्थिती हे देखील योग्य नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
…तर काँग्रेसचे दहा आमदारांचा गट फुटणार होता?
विशेष म्हणजे शिवसेनेचे आमदार महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसच्या देखील दहा आमदारांचा गट महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. शिवसेनेच्या आमदारांच्या बंडखोरीचं प्रकरण लवकर निवळलं असतं तर काँग्रेसमधीलही धुसफूस उफाळून आली असती अशा चर्चा रंगल्या होत्या. पण काँग्रेसकडून या बातम्यांचं खंडन करण्यात आलं होतं. ही सगळी खोटी माहिती असल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.