शिवसेनेला झटका देणारी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे आता बंडखोर शिंदे गटाच्या मार्गावर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे नेतेपदाच्या राजीनाम्याचं पत्र पाठवलं आहे. अडचणीच्या काळात पक्ष आणि नेतृत्व पाठिशी न राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी ईडीने केलेल्या कारवाईवेळी पक्ष नेतृत्वाकडून आजारपणात साधी विचारपूसही न केल्याची खंत व्यक्त केली. विशेष म्हणजे आनंराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ एकनाथ शिंदे गटात आधीपासूनच आहेत. त्यामुळे आता आनंदराव देखील त्यांच्यासोबत जावून मिळणार असल्याची चर्चा आहे.
अमरावतीच्या सिटी बँकेत अनियमितता झाल्याच्या आरोपावरून ईडीने शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या घरी धाड टाकली होती. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची दाट शक्यता होती. मात्र, अचानक प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तरीही ईडीचे अधिकारी तब्बल 14 तास रुग्णालयात तळ ठोकून होते. अखेर अधिकारी तिथून निघून गेले होते. विशेष म्हणजे ईडीने अडसूळ यांना चौकशीसाठी अनेकदा समन्स बजावले होते. पण ते चौकशीसाठी हजर राहू शकले नव्हते.
दरम्यान, आनंदरावर अडसूळ यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांना सध्यातरी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाकडून अडचणींच्या काळात साधा फोन करुन विचारपूसही करण्यात आली नाही म्हणून आनंदराव नाराज आहेत. त्यातूनच त्यांनी उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र पाठवलं आहे. या पत्रावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतात, ते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.